नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत स्तरावरील विकास कामांना मंजुरी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे सोमवारी धुळे दौऱ्यावर आल्या होत्या. याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस मधुकर पाटील, युवा नेते ॲड.राऊ दिलीपराव मोरे, तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील यांनी त्यांची भेट घेऊन निवेदन दिले. नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवकांना विकासकामे करता यावीत म्हणून निधी उपलब्ध करुन द्या अशी मागणी निवेदनातून करण्यात आलेली आहे. याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे धुळे जिल्हा निरीक्षक अर्जुन टिळे, संदीप बेडसे, किरण शिंदे, धुळे जिल्हा शहराध्यक्ष रणजित राजे भोसले, जि. प.सदस्य पोपटराव सोनवणे, युवक प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित सिसोदे आदी उपस्थित होते.