नंदूरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यातील अतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असून परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ऊस वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाहनांवर कारवाई करू नये असे आदेश पालकमंत्री ॲड. के.सी.पाडवी यांनी परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
नंदुरबार जिल्ह्यातील ऊस तोडणी अजूनही संपलेली नाही अजूनही मोठ्या प्रमाणात तोडणी बाकी असल्याने ऊस उभा असल्याचे चित्र आहे. यावर्षी नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उसाची लागवड करण्यात आली होती.प्रस्तावित क्षेत्रापेक्षा जास्त उसाची लागवड झाल्याने कारखान्यांचे नियोजन कोलमडले आहे. यात वाढत्या उष्णतेने मजुरांची ही मोठी समस्या असल्याने ऊस तोडणीला विलंब होत असल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. अतिरिक्त उसाच्या संदर्भात राज्य शासन गंभीर असून जिल्हा प्रशासनाला कारखाना प्रशासना सोबत बैठका घेण्याचे आणि ऊस तोडणी लवकरात लवकर संपवण्याच्या आदेश देण्यात आल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी दिली आहे. त्याच्या सोबत शेतकऱ्यांची वाहने कारखान्यात ऊस घेऊन जात असताना परिवहन विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांना त्रास देत असल्याच्या तक्रारी पालक मंत्री ॲड.के. सी. पाडवी यांच्याकडे प्राप्त झाल्यानंतर पालकमंत्री ॲड. पाडवी यांनी परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या ऊस वाहतूक करणार्या वाहनांवर कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत. एकूणच अतिरिक्त उसाचा प्रश्न यामुळे शेतकऱ्यांना संतप्त भावना आहेत व प्रशासनाने त्यांच्या प्रश्न लवकर मार्गी लावत असून सरकार यासंदर्भात गंभीर असून योग्य त्या खबरदारी घेतल्या जात आहेत तसेच उपाययोजनाही केल्या जातात परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन कारवाई न करण्याचे आदेश दिल्याची माहिती जिल्ह्याचे पालक मंत्री ॲड. के.सी.पाडवी यांनी दिली.