नंदुरबार l प्रतिनिधी
उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरातून नवोदित खेळाडूंची मैदानाकडे ओढ वाढत आहे. यातून बाल खेळाडूंचे मैदानाशी नाते जोडले जाणार आहे, असे प्रतिपादन क्रीडा उपसंचालक सुनंदा पाटील यांनी केले. ते येथील उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नंदुरबार व नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नंदुरबार, नंदुरबार जिल्हा फिजिकल एज्युकेशन फाऊंडेशन व आबाजी स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन नुकतेच यशवंत विद्यालयाच्या क्रीडांगणावर झाले. यावेळी उद्घाटन क्रीडा उपसंचालक सुनंदा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक संघाचे सचिव प्राचार्य पुष्पेन्द्र रघुवंशी, जिल्हा टेनिक्वॉईट संघटनेचे अध्यक्ष पंकज पाठक, उपाध्यक्ष श्रीराम मोडक, कराटे प्रशिक्षक दिनेश बैसाणे, खो-खो प्रशिक्षक अनिल रौंदळ, खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्राच्या एन.आय.एस. प्रशिक्षिका सुवर्णा राठोड, महाराष्ट्र टेनिस क्रीकेटचे सचिव जगदिश वंजारी, क्रीडा कार्यकर्ते प्रा.डॉ.मयुर ठाकरे, फ्लोअरबॉल संघटनेचे सचिव जितेंद्र माळी, सहसचिव भरत चौधरी आदी उपस्थित होते. श्रीमती पाटील पुढे म्हणाल्या की, बाल वयात मोबाईल, इंटरनेटशी मैत्री न करता मैदानाशी नाते जोडणे गरजेचे आहे. पालकांनीही मुलांच्या या मैदानावरील सातत्यासाठी सतत लक्ष द्यायला हवे. तसेच प्राचार्य पुष्पेंद्र रघुवंशी यांनी खेळाडूंना शुभेच्छा देत नंदुरबार जिल्ह्यात क्रीडा चळवळ जिवंत राहण्यासाठी एकत्रित काम करणे गरजेचे असल्याचे सांगितले. या शिबिरात बॉक्सिंग, योगा, ऍथलेटिक्स, वुशु, क्रिकेट, किक बॉक्सिंग, टेनिक्वॉईट आदी खेळांचे प्रशिक्षण दिले जात असून २० मे रोजी शिबिराची सांगता होणार आहे. शिबिर यशस्वीतेसाठी आनंदा मराठे, गोपाल चव्हाण, राकेश चौधरी, मनिष सनेर, नकुल चौधरी, योगेश माळी, राजेश्वर चौधरी, प्रदीप माळी, तेजस्विनी चौधरी, आदी परिश्रम घेत आहेत.