नंदुरबार | प्रतिनिधी
धडगाव येथील पोलीस ठाण्यातील अंमलदाराच्या कक्षात पोलीस शिपायास हाताबुक्यांनी मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तिघांविरूध्द धडगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या महितीनुसार, संशयीत आरोपी अनिल सुखलाल पावरा यांना पोलीस शिपाई योगेश निकम यांनी केलेल्या कारवाईत व कार्यकारी दंडाधिकारी धडगांव यांच्याकडील नोटीस पोलीस शिपाई मनोज महाजन यांनी बजावली होती. त्याचा राग मनात धरून सगळे पोलीस सारखे असून काही कामधंदा करीत नाही. असा गैरसमज करून धडगांव शहरातील पोलीस ठाण्यात अंमलदार कक्षात अनिल सुखलाल पावरा व इतर दोघांनी पोलीस शिपाई शशिकांत वसईकर काम करीत असतांना गच्चीधरून खाली पाडून शिवीगाळ करून हाताबुक्यांनी मारहाण केली. या मारहाणीत पोलीस शिपाई शशिकांत वसईकर यांना दुखापत झाली. तसेच महिला पोलीस शिपाई सुनिता पाचोरे यांच्या बारनेशी टेबलावरील रजिष्टरे, अस्ताव्यस्थ करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून पोलीस शिपाई शशिकांत रमेश वसईकर यांच्या फिर्यादीवरून धडगांव पोलीस ठाण्यात अनिल सुखलाल पावरा, लकडया सुकलाल पावरा, सुखलाल वल्या पावरा सर्व रा.वलवाड (ता.धडगांव) यांच्या विरूध्द भादंवि कम ३५३, ३३२, ३२३, ५०४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक जे.आर. औताडे करीत आहेत.