नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील साईबाबा नगरात कुटूंबिय बाहेरगावी गेल्याची संधी साधत चोरटयांनी शिक्षकाच्या घरी डल्ला टाकून धाडसी घरफोडी केल्याची घटना घडली. याप्रकरणी अनोळखीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील कोकणी हिलमधील साईबाबा नगरात राहणारे शिक्षक शिवाजी पितांबर चौधरी हे कुटूंबियांसह बाहेरगावी गेले होते. चोरटयांनी घर बंद असल्याची संधी साधून दरवाजाचा कडीकोंडा तोडत आत प्रवेश केला. यावेळी लोखंडीकोठी व प्लायवुडच्या कपाटातून ३ लाख १० हजार रूपयांची रोकड व ८ हजार रूपये किंमतीचे २ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने त्यात एक सोन्याची बिस्कीट व एक कॉईन चोरून नेला आहे. बाहेरगावाहून आल्यानंतर घरात चोरी झाल्याचे चौधरी कुटूंबियांच्या लक्षात आले. ही घटना दि.११ ते १३ मे रोजीच्या दरम्यान घडली आहे. याबाबत शिवाजी पितांबर चौधरी यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ४५४, ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक माधुरी कंखरे करीत आहेत.