नंदुरबार l प्रतिनिधी
वीरशैव लिंगायत गवळी समाजाचे आराध्य दैवत गुरुवर्य बालब्रह्मचारी परमपूज्य सिदाजीआप्पा देवर्षी यांच्या 55 व्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी सायंकाळी प्रतिमा पूजनसह अभिवादन करण्यात आले.
शहरातील बालवीर चौक परिसरात महाराष्ट्र राज्य वीरशैव लिंगायत गवळी समाज बहुउद्देशीय संस्थेच्या नंदुरबार शाखेतर्फे प्रतिमा पूजन आणि महाआरती करण्यात आली. यावेळी उपस्थित समाज बांधवांना कपाळावर भस्म (ईबित) लावून शिवशरणार्थ संबोधण्यात आले. ज्येष्ठ सल्लागार प्रकाश घुगरे यांच्या हस्ते परमपूज्य सिदाजी आप्पा देवर्षी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. संस्थेचे सचिव अशोक यादबोले यांच्या हस्ते आरती करण्यात आली. आरतीनंतर सिदाजी आप्पा यांचे चांगभलेचा जयघोष करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे जिल्हा कार्याध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी सांगितले की, गवळी समाजाचे आराध्य दैवत आणि गुरुवर्य परमपूज्य सिदाजीआप्पा देवर्षी यांचे जन्मस्थळ कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यातील चीटगुप्पा गावात मोठे मठ आहे. तसेच बीड व नगर जिल्ह्यातील सीमेवरील सावरगाव येथे देखील मंदिर आहे. दरवर्षी श्रावण महिन्यात देशातून लाखो समाज बांधव नतमस्तक होतात. 20 मे 1967 रोजी मोहिनी एकादशीला परमपूज्य सिदाजीआप्पा देवर्षी यांचे देहावसन झाले. म्हणून मोहिनी एकादशीला पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात येते. बालवीर चौकात आयोजित अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी राधाबाई घुगरे,सुनंदा घटी, सुनिता हिरणवाळे, कल्पना नागापुरे, लीना हिरणवाळे, भाग्यश्री हिरणवाळे, जिल्हा कार्याध्यक्ष महादू हिरणवाळे, संस्थेचे सचिव अशोक यादबोले, आनंदा घुगरे, शंकर घटी, जगदीश यादबोले, सिद्धू नागापुरे, चुडामण पाटील, संजय चौधरी,भास्कर रामोळे, प्रकाश खेडकर, मंथन वानखेडे, जयदीप वानखेडे आदी उपस्थित होते.