नंदुरबार l प्रतिनिधी
केंद्र शासन पुरस्कृत जलशक्ती अभियान कार्यक्रमांतर्गत Catch the rain अंमलबजावणी व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने ‘अमृत सरोवर’ निर्मिती करण्यासाठी जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली.
या बैठकीस जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, सहाय्यक वन उप संरक्षक शहादा कृष्णा भवर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) शाहुराज मोरे तसेच सर्व अंमलबजावणी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी सांगितले अमृत सरोवर निर्मिती हा शासनाच्या प्राधान्याचा कार्यक्रम असल्यामुळे सर्व अंमलबजावणी यंत्रणांनी तातडीने या कामास सुरुवात करावी. या जिल्ह्यात 75 अमृत सरोवर करावयाचे असले तरी त्यापेक्षा जास्तीचे सरोवर करण्याचा प्रयत्न करावा अशा सूचनाही त्यांनी यावेळी संबंधित विभागांना दिल्या. यावेळी त्यांनी गांव तलाव/वनतळे/शेततळे, चालु वर्षात सुरु असलेले गाळ काढावयाची कामे, नालाखोलीकरणाची कामे, नालाखोलीकरण व पुनरुज्जीवनासाठी उपलब्ध स्थळांची माहिती आदि विषयांचा आढावा घेतला.उपजिल्हाधिकारी शाहुराज मोरे यांनी यावेळी जलशक्ती अभियान व अमृत सरोवर अभियानाबाबत थोडक्यात माहिती दिली.