नंदूरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील बिजरी येथे सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा, कॅरिअर निवड विषयक मार्गदर्शन शिबीर व सेवानिवृत्तींचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.यावेळी वृक्षांच्या छायेत 200 च्यावर विद्यार्थ्यांनी सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा दिली.
धडगांव तालुक्यातील बिजरी येथे आदिवासी जननायक बिरसा मुंडा सार्वजनिक वाचनालच्या वतीने सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात आली होती. यात 200 च्या वर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यात प्राथमिक गटात प्रथम क्रमांक अंजली किसन पावरा(बिजरी), द्वितीय क्रमांक खुशी अमरसिंग वसावे(काकरपाटी), तृतीय क्रमांक कमलेश जंगलसिंग पटले (बिजरी), सुजल राजेंद्र पटले (बिजरी), माध्यमिक गटात प्रथम क्रमांक गणेश सुभाष वसावे (बिजरी), द्वितीय क्रमांक वर्षा पिंट्या पावरा (भोगवाडे), तृतीय क्रमांक अभिजीत दामोदर पावरा(रोषमाळ), तर वरिष्ठ गटात प्रथम क्रमांक निलेश चिणक्या पावरा (बोरद), द्वितीय क्रमांक दिनेश जान्या वसावे (बिजरी), तृतीय क्रमांक राकेश दोहाण्या पावरा(रोषमाळ)या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. यशस्वी विद्यार्थ्यांना दि.11 मे रोजी बक्षिस म्हणून ग्रंथ बक्षिसे देण्यात आली. या कार्यक्रमाला विद्यार्थी पालकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ.मोहन पावरा सर (एस.एस.व्ही.पी.एस. कॉलेज धुळे, सिनेट सदस्य उमवि, जळगाव) हे लाभले होते. याप्रसंगी त्यांनी सांगितले की, शिक्षणाने आपण आपला समाज, आपला देश घडवू शकतो. आपण अपयशी झालो तरी जीवनात खचून जायचे नसते. आत्मविश्वासाने पुन्हा संकटावर मात करून पुढे जायचं असतं असे प्रेरणादायी वक्तव्य त्यांनी केले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून आपसिंग वसावे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी संकटावर मात करून पुढे जायचं असतं. विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर रहावे. लहान वयातच आपले ध्येय निश्चित करावे. सामाजिक माध्यमे आणि तंत्रज्ञानाचा शैक्षणिक वापरासाठी जास्तीत जास्त वापर करावा असे त्यांनी आवाहन केले. आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल वसावे यांनी त्यांच्या आत्तापर्यंतच्या गीर्यारहण प्रवासातील अनुभव व यशस्वी मोहिमा बद्दल सांगितले. योगेश मराठे यांनी आदिवासी विद्यार्थ्यांत खूप क्षमता असतात. आपली क्षमता ओळखून आपले ध्येय निश्चित करावे असे सांगितले.
त्यानंतर बिजरी गावातील सेवानिवृत्त कर्मचारी यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात होता. यात श्री.जंगलसिंग वसावे(पोलीस) यांनी सर्वांचे आभार मानुन आपले मनोगत व्यक्त केले. बन्सिलाल वसावे(सैनिक) यांनी देश सिमेवर कर्तव्य बजावतांनाचे अनुभव सांगितले. त्यांनी देशभक्तीपर संदेश दिला. आट्या पावरा यांनी शिक्षणाचा योग्य पद्धतीने वापर करावा. असे त्यांनी सांगितले. आणि त्यानंतर सर्वांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोना पटले, सिंगा पटले, चंद्रसिंग पटले, संदिप पटले आदींसह वाचनालयाच्या व युवा टिमने तसेच गावातील सर्व नागरिकांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप पटले यांनी केले. तर आभार महेंद्र वसावे यांनी मानले.