तळोदा । प्रतिनिधी
शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील ऋणानुबंध वेगळेच असतात. याचा प्रत्यय अक्कलकुव्वा तालुक्यातील वाण्याविहिर येथील श्री सातपुडा वैभव विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालयात आला. औचित्य होते प्राचार्य/मुख्याध्यापक दत्तात्रय तोताराम सूर्यवंशी यांच्या सेवापूर्ती सोहळ्यातचे. त्यांच्या ३३ वर्ष प्रदीर्घ सेवेत त्यांनी ज्ञानदान करतांना आपल्या विद्यार्थ्यांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले. आपल्याला घडविणाऱ्या शिक्षकांचा सेवापूर्ती सोहळा असल्याने नोकरी तसेच व्यवसायानिमित्त राज्यभरात असलेले विद्यार्थ्यांनी वाण्याविहिर गाठले. त्याचबरोबर सासुरवाशिण असलेल्या विद्यार्थींनीही आपल्या लाडक्या शिक्षकाला निवृत्ती नंतरच्या शुभेच्छा देण्यासाठी रणरणत्या उन्हात आपल्या गावी येऊन सूर्यवंशी दांपत्याचा सत्कार करून त्यांनी दिलेली शिकवण आजही वाटचाल करीत यशस्वी जीवन जगत असल्याच्या भावना व्यक्त करतांना विद्यार्थींनींनी गहिवरून आल्या.
दरम्यान या कार्यक्रमास राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांबरोबरच तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षकाप्रती माजी विद्यार्थींनी आपआपल्या मनोगतात त्यांनी दिलेल्या मोलाचे मार्गदर्शनामुळेच आज इथवर पोहोचल्याच्या भावना बोलून दाखवल्या. त्यावेळी मान्यवरांकडून असेच आदर्श शिक्षक सर्वांना लाभावे अशा भावना व्यक्त करण्यात आल्या. यावेळी दत्तात्रय सूर्यवंशी यांनी राज्यस्तरीय स्पर्धेत त्यांनी घडवलेले खेळाडूही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दत्तात्रय सूर्यवंशी यांनी आपल्या सेवाकाळात ज्ञानदान करून विद्यार्थी घडवले तसेच निवृत्तीवेळीही विद्यार्थ्यांसाठी शाळेला एक लाख रुपये देणगी देत दातृत्वाचा आदर्श घालून दिला.