नंदुरबार l प्रतिनिधी
वल्लभ कुलभूषण वैष्णवाचार्य प.पु वज्रराजकुमारजी महाराज यांचे आज नंदनगरीत आगमन होत असून, बृहत गुजराती पुष्टीमार्गिय वैष्णव वाणीक समाजाच्या वतीने 2 दिवस धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
समाजाध्यक्ष विनयभाई श्रॉफ यांनी धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजन बाबत माहिती देण्यासाठी शहरातील बाबुभाई चक्कीवाला गुळवाडी येथे पत्रकार परिषद घेतली. प.पु वज्रराजकुमार महाराज यांचे आज मंगळवार दिनांक १० मे रोजी दुपारी २ वाजता शहरातील मोठा मारुती मंदिर परिसरात आगमन होईल. यावेळी त्यांचे ढोल-ताशांच्या व पुष्पवर्षावात जल्लोषात स्वागत करण्यात येईल. सायंकाळी ५.३० ते ७ वाजेदरम्यान गुळवाडीत समाजाच्या पदाधिकाऱ्यांशी हितगूज व मार्गदर्शन करतील.शहरात प.पु व्रजकुमार महाराज यांच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक उपक्रम सुरू आहेत. त्यात वैष्णव समाज कसा अंतर्मुख होईल याची रूपरेषा यावेळी ठरवण्यात येईल.
बुधवार,११ मे रोजी शहरातील देसाईपुरा परिसरातील पुष्टीधाम येथे सकाळी ९ ते १० वाजे दरम्यान ब्रह्मसंबंध ( गुरुमानाने)कार्यक्रम होईल.त्यानंतर सायंकाळी ८ ते १० वाजेदरम्यान जाहीर प्रवचन होईल. २ दिवस चालणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांच्या नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन समाजाध्यक्ष विनयभाई श्रॉफ, बकुलभाई शाह ,मुकुंद गुजराथी,हरेश पारेख,डॉ.नुतन शाह,रोहीत शाह व वैष्णव समाजाच्या सर्व पोट जातींच्या अध्यक्षांनी केले आहे.








