नंदुरबार l प्रतिनिधी
उसनवारी घेतलेल्या रक्कमेपोटी दिलेला दहा लाख रूपयांचा धनादेश अनादर झाल्याप्रकरणी एकाला सहा महिन्यांची शिक्षा व एक लाख २० हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आला आहे. तसेच मुद्दलची १० लाख रुपयांची रक्कम देखील देण्याचे आदेश दिले आहेत. हा निकाल नंदुरबार ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट वर्ग १ यांच्या न्यायालयाने दिला आहे.
नंदुरबार येथील अर्जुन रामदास मराठे यांनी आपला मित्र चेतन विश्वनाथ उमराणकर यास दहा लाख रुपये व्यवसायिक व घरगुती कारणासाठी हात उसनवारीने दिले होते. त्या रक्कमेपोटी चेतन विश्वनाथ उमराणकर याने अर्जुन मराठे यांना दहा लाख रुपयांचा धनादेश दिला होता. परंतु उसनवारीने दिलेले पैसे परत केले नाही, म्हणुन अर्जुन रामदास मराठे यांनी मिळालेला दहा लाख रुपयांचा धनादेश बँक खात्यात वटविण्यासाठी टाकला. मात्र चेतन विश्वनाथ उमराणकर याच्या बँक खात्यात रक्कम नसल्याने सदरचा धनादेश वटला नाही. याबाबत अर्जुन रामदास मराठे यांनी वकीलांमार्फत लेखी रक्कम मागणीची नोटीस आरोपी चेतन उमराणकर यास पाठविली. त्यानंतर देखील उमराणकर यांनी रक्कम न दिल्यामुळे अर्जुन रामदास मराठे यांनी नंदुरबार येथील ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट वर्ग १ यांच्या कोर्टात फिर्याद दिली होती. या फिर्यादीनुसार चौकशी झाली असता दहा लाख रुपयांचा धनादेश अनादर झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आरोपी चेतन विश्वनाथ उमराणकर यास ६ महिन्याची शिक्षा, एक लाख २० हजार रुपयांचा दंड व दहा लाख रुपयांची मुद्दल रक्कम परत देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या खटल्यात फिर्यादी यांच्यातर्फे अॅड.धनराज गवळी यांनी कामकाज पाहिले तर त्यांना अॅड.हितेंद्र राजपूत, अॅड.शुभांगी चौधरी यांनी सहकार्य केले.