अक्कलकुवा l प्रतिनिधी
गेल्या 10 दिवसात दोन वेळा बंद पाडलेले देहली प्रकल्पाचे काम अखेर पोलीस बंदोबस्तात सुरु करण्यात आले.
गेल्या 40 वर्षापासुन रखडत असलेल्या देहली प्रकल्पाच्या प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सुटत नसल्याने जानेवारी महिन्यात सुरु झालेले घळ भरणीचे अंतिम टप्प्यातील काम हे गेल्या 10 दिवसात प्रकल्प ग्रस्तांनी दोन वेळा बंद पाडले होते.
दि.26 एप्रिल व दि 4 मे रोजी प्रकल्प ग्रस्तांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी काम बंद पाडले.दि.26 रोजी काम बंद पाडल्यामुळे त्या अनुषंगाने अधिक्षक अभियंता,उपअभियंता व शाखा अभियंता यांनी तात्काळ आंबाबारी पुनर्वसन येथे जाऊन प्रकल्पग्रस्त व लोक संघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांच्या सोबत गावठाणात बैठक घेतली. बैठकी दरम्यान प्रकल्पग्रस्तांनी जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत प्रकल्पाचे काम सुरु करु देणार नाही असा ठाम पवित्रा घेतला होता. व ठेकेदाराचे प्रतिनिधी यांनाही काम न करणेबाबत ताकीद दिली होती.त्या अनुषंगाने पालकमंत्री ना.के.सी.पाडवी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रकल्पग्रस्तांची बैठक घेऊन पुढील कार्यवाही होत असल्याबाबत प्रकल्पग्रस्तांना अवगत केले होते व घराच्या घसारा पोटी सानुग्रह अनुदान तातडीने देण्याची कार्यवाही केली.दि.3 रोजी 692 प्रकल्पग्रस्तांना सुमारे 2 कोटी 5 लाख रुपयांचे धनादेश द्वारे वाटप ही सुरु करण्यात आले व झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री ना.ॲड.के.सी.पाडवी यांनी भ्रमनध्वनी द्वारे प्रकल्पग्रस्तां सोबत संवाद साधुन काम सुरु करण्याची विनंती केली होती त्या नुसार काल दि.4 रोजी प्रकल्पाचे काम पुन्हा सुरु करण्याचे ठरले.व सकाळी प्रत्यक्ष कामाला सुरुवात होताच प्रकल्पग्रस्तांच्या 25 ते 30 लोकांनी प्रकल्प स्थळी येऊन पुन्हा काम बंद पाडले त्यामुळे आज दि.5 रोजी प्रांताधिकारी डॉ.मैनाक घोष,तहसीलदार सचिन मस्के, पोलीस उपअधिक्षक संभाजी सावंत, देहली प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता तुषार चिनावलकर,पोलीस निरीक्षक इसामोद्दीन पठाण यांनी प्रकल्प स्थळी येथे येऊन जुन्या गावठाणात प्रकल्पग्रस्तां सोबत बैठक घेऊन प्रकल्प ग्रस्तांच्या मागण्यांवर शासन व प्रशासनाकडुन युध्द पातळीवर कार्यवाही सुरु असल्याचा विश्वास दिला तसेच तळोदा प्रकल्प कार्यालयात स्वाभिमान योजनेत शेती विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची बैठक घेऊन पुढील कार्यवाही होत असल्या बाबत प्रकल्पग्रस्तांना अवगत करुन स्वाभिमान योजनेअंतर्गत शेती उपलब्ध करुन देण्याचे पत्र दिले.स्वाभिमान योजने अंतर्गत देण्यात येणाऱ्या शेत जमिनीचे दर निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या सोबत पुढील आठवड्यात बैठक निश्चित करण्यात आली आहे.तसेच ,102 शेतकऱ्यां व्यतिरिक्त ज्या भुमीहीनांचे स्वाभिमान योजनेसाठी नावे सुटलीत त्यांची नावे समाविष्ट करावी करण्यात येतील असे आश्वासन दिले.त्यामुळे आज सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गावित यांच्या सह मोठ्या पोलीस बंदोबस्तात देहली प्रकल्पाच्या कामाला पुन्हा प्रारंभ करण्यात आला.
देहली प्रकल्पाच्या प्रकल्प बधितांना स्वाभिमान सबळीकरण योजनेअंतर्गत तालुक्यात शेत जमीन देणे आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना स्वाभिमान योजनेत आपली शेत जमीन विक्री करावयाची असेल त्या शेतकऱ्यांनी आपल्या शिवारातील तलाठी किंवा प्रकल्प अधिकारी तळोदा, तसेच तहसिल कार्यालय अक्कलकुवा येथे संपर्क साधावा असे आवाहन तहसीलदार सचिन मस्के यांनी केले आहे.