मुख्य निवडणुक आयोगाच्या आदेशानुसार 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमांतर्गत 9 ऑगस्ट 2021 ते 31 ऑक्टोंबर 2021 या कालावधीत दुबार, समान नोंदी, एकापेक्षा अधिक नोंदी, तार्किक त्रृटी दुर करणे, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेद्वारे घरोघरी भेट देऊन तपासणी व पडताळणी करण्यासोबत योग्यप्रकारे विभाग, भाग तयार करुन मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणीकरण करण्यात येणार आहे.
तार्किक त्रृटी दूर करण्याशी संबंधित सर्व कामे, मतदारांचे छायाचित्र आणि मानक नसलेल्या ईपीक आणि ईपीक मालिकेचे विश्लेषण पूर्ण झाल्यानंतरच 1 नोव्हेंबर 2021 रोजी पुनरिक्षण उपक्रमातंर्गत एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधीत मुख्य निवडणूक अधिकारी यांनी निश्चित केलेल्या दिवशी विशेष मोहिम राबविण्यात येईल.
दावे व हरकती 1 नोव्हेंबर 2021 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत स्विकारण्यात येतील. दावे व हरकतींची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर किमान सात दिवसांचा कालावधी संपल्यानंतर दावे व हरकती निकाली काढण्यात येतील.
दावे व हरकती 20 डिसेंबर 2021 पर्यंत निकाली काढण्यात येवून 5 जानेवारी 2022 रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी कळविले आहे.