राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य शासन सर्वतोपरी उपाययोजना करीत असून जिल्ह्यातील सर्व धार्मिक व सेवाभावी संस्थांनी गरजूंना मदत व्हावी याकरीता मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान द्यावे, असे आवाहन सहायक धर्मादाय आयुक्त सु.ज. लाड यांनी केले आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सांगली व अन्य जिल्ह्यामध्ये आलेल्या महापूरामुळे खुप मोठी जिवीतहानी व नुकसान झाले आहे. महापूरामुळे, दरड कोसळल्यामुळे व लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रात निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता सामाजिक बांधिलकी व सामाजिक उत्तरदायित्वाच्या उद्देशाने स्थापन झालेल्या सर्व धर्मादाय संस्थानी मदतीसाठी पुढाकार घेणे, तसेच गरीब व कष्टकरी तसेच मजूर यांच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी त्यांना जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, औषधौपचार इत्यादी मदत आणि मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आर्थिक योगदान देणे गरजेचे आहे.
विविध संस्थांनी मदत केल्यास गरजूंना आवश्यक मदत करता येईल. त्यासाठी जिल्हाधिकारी यांचेशी समन्वय साधून गरजूंना धर्मादाय संस्थांनी शक्य तेवढी मदत करावी. तसेच आर्थिक स्वरुपात मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये बँक खात्यावर चेक किंवा डीडीद्वारे योगदान द्यावे. मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधी बँक खात्याचा तपशिल- मुख्यमंत्री सहायता निधी, बचत खाते क्रमांक 10972433751 , स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई मुख्य शाखा फोर्ट, मुंबई 400 001, शाखा कोड-00300, आयएफएस कोड एसबीआयएन 0000300 असा आहे.