नंदुरबार l प्रतिनिधी
सध्याच्या आधुनिक युगात लहान मुलांपासुन ते वयोवृध्द व्यक्ती ह्या सोशल मिडीयाचा वापर करतांना दिसुन येत आहेत.सोशल मिडीयाचा वापर करुन वेळेची बचत तसेच चांगले लेख व्हिडीओ प्रसारीत करुन चांगले संदेश देता येतात परंतु सोशल मिडीया वरुन काही लोक दोन धर्मात तेढ निर्माण होईल अशा आक्षेपार्ह पोस्ट,लेख लिहुन जातिय भावना भडकविण्याचा प्रयत्न करतात.म्हणुन सोशल मिडीया व इंटरनेटच्या माध्यमातुन पोस्ट करतांना सामाजिक भान ठेवाव व कोणतीही पोस्ट सोशल मिडीयावरुन(फेसबुक, इंन्स्टाग्राम,ट्विटर व व्हॉट्सॲप)प्रसारीत करतांना ती पोस्ट आक्षेपार्ह आहे अगर कसे ? बाबत खात्री करुन मगच प्रसारीत करण्याची काळजी घ्यावी.आक्षेपार्ह पोस्ट प्रसारीत करणाऱ्या इसमाविरुध्द भारतीय दंड संहीता व माहीती तंत्रज्ञान अधिनियम 2000 (IT ACT 2000) प्रमाणे कठोर कारवाई करण्यात येईल असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तसेच सायबर सेल यांचेकडुन वृत्तपत्र व सोशल मिडीयाद्वारे वारंवार नागरीकांना आवाहन करण्यात येते.तरी देखील दि.20 एप्रिल 2022 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास नंदुरबार शहरात राहणारा व्यापारी राकेश कुंजबिहारी शाह या व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांने SHREE MIRCHI या व्हॉट्सॲप गृपवर त्याचे मोबाईलवरुन विशिष्ट एका समाजाच्या धार्मीक भावना दुखावल्या जावुन दोन धर्मात तेढ निर्माण होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशा मजकुराचा संदेश नंदुरबार शहरातील SHREE MIRCHI या व्हॉट्सॲप गृपवर प्रसारीत केलेला असलेबाबत प्रभारी पोलीस अधीक्षक, नंदुरबार विजय पवार यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली.प्रभारी पोलीस अधीक्षक, नंदुरबार विजय पवार यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर सायबर सेल नंदुरबार यांना सदर बाब सांगून कठोर कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशीत केले. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर सायबर सेल नंदुरबार यांनी सायबर सेलच्या अंमलदारांना बोलावुन सदरची घटने बाबत इत्थंभुत माहिती देवून संशयीत इसमास ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशीत केले.त्याअनुषंगाने सायबर सेलचे पोलीस अंमलदार यांनी तात्काळ संशयीत इसमाचा नंदुरबार शहरात शोध घेवून त्यास ताब्यात घेतले व त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव राकेश कुंजबिहारी शाह, मिरची व्यापारी,रा.प्लॉट नं.18, एम एल टाऊन नंदुरबार ता.जि.नंदुरबार असे सांगीतले.त्यानंतर त्याचा मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केले असता SHREE MIRCHI या व्हॉट्सॲप गृपवर विशिष्ट एका समाजाच्या धार्मीक भावना दुखावल्या जावुन दोन धर्मात जातीय तेढ निर्माण करणारा संदेश प्रसारीत केलेला होता. तसेच त्याने त्याचे मोबाईलमधील इतर 3 व्हॉट्सॲप गृपवर सदरचा आक्षेपार्ह संदेश प्रसारीत केलेला असल्याचे दिसुन आले.
ताब्यात घेण्यात आलेल्या राकेश कुंजबिहारी शाह याचा मोबाईल जप्त करुन त्याचे विरुध्द विशिष्ट एका समाजाच्या धार्मीक भावना दुखावल्या जावुन दोन धर्मात तेढ निर्माण करणारा संदेश प्रसारीत केला म्हणून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भादवि कलम 295(अ) व माहीती तंत्रज्ञान अधिनियम चे कलम 67 प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात करण्यात आली असून त्याची पोलीस कोठडी घेतली आहे.सदर बाबत अधिक तपास करून हा संदेश कोठुन आला ? व्हॉट्सॲप ग्रुप चे ॲडमिन कोण आहेत. या बाबत पोलीस अधिक तपास करुन त्याच्यावर देखील कारवाई करण्यात येणार आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नंदुरबार पी.आर. पाटील,प्रभारी पोलीस अधीक्षक नंदुरबार विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर,पोलीस नाईक कन्हैया पाटील, हितेश पाटील,राकेश मोरे,मोहन ढमढेरे, रामेश्वर चव्हाण,आनंदा मराठे यांचे पथकाने केली आहे.नंदुरबार जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, फेसबुक,इंन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप,ट्विटर व इतर सोशल मिडीयावर धार्मीक भावना भडकविणाऱ्या दोन जातींमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या व खोट्या बातम्या प्रसारीत करणारे व्हिडीओ किंवा पोस्ट प्रसारीत करु नये. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.आक्षेपार्ह व्हिडीओ, पोस्ट प्रसारित करतांना कोणीही आढळुन आल्यास त्याच्याविरुध्द् तसेच संबंधित ॲडमिनवर कठोर कायदेशीर कारवाई करुन गुन्हा दाखल करण्यात येईल तसेच आक्षेपार्ह मजकुराबाबत माहीती प्राप्त झाल्यास त्वरीत नजिकच्या पोलीस ठाणे किंवा पोलीस नियंत्रण कक्ष नंदुरबार येथे देण्यात यावी असे प्रभारी पोलीस अधीक्षक, नंदुरबार विजय पवार यांनी आवाहन केले आहे.