नंदुरबार l प्रतिनिधी
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,नंदुरबार अंतर्गत नंदुरबार,नवापूर व शहादा या कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल पब्लिक स्कुलमध्ये शैक्षणिक वर्ष सन 2022-2023 प्रवेशासाठी इयत्ता सहावीच्या वर्गात नियमित प्रवेश तसेच इयत्ता सातवी ते नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या रिक्त जागा भरण्याकरिता अनुसुचित आणि आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांकडून 14 मे 2022 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.
यासाठी विद्यार्थी हा अनुसूचित जमाती, आदिम जमातीचा असावा. पालकांचे वार्षिक उत्पन्न सरासरी 6 लाखापेक्षा कमी असावे. त्याबाबतचा सक्षम प्राधिकाऱ्यांचा दाखला सोबत जोडावा. प्रवेश अर्जासोबत जातीचा दाखला, शैक्षणिक वर्ष 2021-2022 मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे प्रथम सत्र गुणपत्रक जोडावे. सदर प्रवेश प्रक्रियेकरीता 3 टक्के जागा दिव्यांग व आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी 5 जागा आरक्षित असतील.
आरक्षित असलेल्या जागेसाठी विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येईल.सदर प्रवेश प्रक्रियेकरीता प्रवेश पूर्व स्पर्धापरीक्षेचे 5 जून 2022 रोजी सकाळी 11 ते 13 या वेळेत एकलव्य रेसिडेंशियल पब्लीक स्कूल नंदुरबार येथे आयोजित करण्यात येणार आहे.
इयत्ता सहावीच्या वर्गात प्रवेशासाठी इयत्ता पाचवीच्या वर्गातील इंग्रजी व गणित विषयांच्या अभ्यासक्रमानुसार दोन्ही घटकावरील प्रत्येकी 30 प्रमाणे 60 गुण तर नवोदय विद्यालयातील प्रवेश परिक्षासाठी निर्धारीत केलेल्या बुध्दीमत्ता चाचणी या विषयाच्या घटकावर आधारीत 40 गुण अशी एकूण 100 गुणाची परीक्षा घेण्यात येईल.इयत्ता सातवी व नववीच्या वर्गात प्रवेश देण्यासाठी वरील प्रमाणे प्रश्न व गुणसंख्या वर आधारीत असेल.
एकलव्य मॉडेल रेसिडेंसियल स्कूलमध्ये प्रवेशासाठी अर्ज प्रकल्प कार्यालय नंदुरबार, एकलव्य रेसिडेंशियल पब्लीक स्कूल, नंदुरबार तसेच नंदुरबार, नवापूर व शहादा तालुक्यातील गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती येथे उपलब्ध करुन देण्यात आले असून परिपूर्ण अर्ज भरुन 14 मे 2022 पर्यंत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,नंदुरबार, एकलव्य रेसिडेंशियल पब्लीक स्कूल, नंदुरबार तसेच नंदुरबार,नवापूर व शहादा तालुक्यातील गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती येथे येथे जमा करावे. असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल यांनी केले आहे.