नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर येथील एमआयडीसीत कंपनीमधून बाहेर जाण्यास सांगितल्याच्या रागातून सुरक्षा रक्षकास मारहाण केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबात पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर शहरातील एमआयडीसीमध्ये आर.के.इंटरप्रायझेस कंपनी आहे. सदर कंपनीमधील सिक्यूरिटी गार्ड हरिलाल मगन गावित (रा.नांदवण ता.नवापूर) यांनी कंपनीमध्ये शिरलेल्या दिलीप आत्माराम शिंदे (रा.औरंगाबाद) व एक अनोळखी इसम यांना बाहेर जाण्यास सांगितले. याचा राग आल्याने हरिलाल गावित यांना दिलीप शिंदे याने तार कटरने डोक्यावर मारुन गंभीर दुखापत केली. याबाबत हरिलाल गावित यांच्या फिर्यादीवरुन नवापूर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात भादंवि कलम ३२६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.प्रतापसिंग वसावे करीत आहेत.








