नंदुरबार : प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील रनाळे येथे चोरट्यांनी एकाच रात्री चार घरे फोडून हजारोंचा ऐवज लंपास करत गावातील साईबाबा मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून दानपेटीही लंपास केल्याची घटना घडली आहे. दरम्यान, काल पोलिस पथकाने घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार तालुक्यातील रनाळे येथे दि.३ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास गावातील राजंेद्र तुकाराम धात्रक यांच्या घराचे दोन्ही दरवाजांचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला. राजेंद्र धात्रक यांच्या घरातून ११ हजार ५०० रुपयांची रोकड तसेच त्यांचा मोठाभाऊ राहत असलेल्या घरातून चांदीचे १८ हजार ५०० रुपये किंमतीच्या ५०० ग्रॅम वजनाच्या पाटल्या तसेच ५ हजार ५०० रुपये किंमतीचे इतर दागिने असा दोन्ही घरामधून चोरट्यानंी ३५ हजार ५०० रुपये किंमतीचा ऐवज व रोकड लंपास केली आहे. तसेच राजेंद्र धात्रक यांच्याच गल्लीतील रहिवासी गफ्फार बेग कादर बेग यांचे घर फोडून चोरट्यांनी ७०० रुपयांचा टेबल फॅन तर फारुख बुधा पठाण यांचे घर फोडून १ हजार रुपये किंमतीचा गॅस सिलेंडर चोरट्यांनी लंपास केला. याशिवाय रनाळे गावातील दुध डेअरी चौकात असलेल्या साईबाबा मंदिराच्या दरवाजाचे कडीकोंयंडा व कुलूप तोडून मंदिरातील दानपेटी चोरुन त्यातील ७ हजार रुपयांची रोकड चोरुन नेली. एकाच रात्रीतून चार घरे फोडून हजारोंचा ऐवज लंपास करण्यात आला. याशिवाय मंदिराची दानपेटी चोरुन चोरटे फरार झाले. यामुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली. दरम्यान, काल दुपारी पोलिस उपअधिक्षक सचिन हिरे, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर, तालुका पोलिस निरीक्षक अरविंद पाटील यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. यावेळी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. पोलिसांकडून सदर चोरट्यांचा लवकरच बंदोबस्त करुन चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे माजी सहसंपर्क प्रमुख दीपक गवते, साईबाबा ट्रस्टचे संजय जयस्वाल व ग्रामस्थ उपस्थित होते. याप्रकरणी राजेंद्र धात्रक यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात भादंवि कलम ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस योगेश चौधरी करीत आहेत.