नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील इंदिरा मंगल कार्यालय परिसरात विद्युत वाहिन्यांचा स्पर्श चाऱ्याला झाल्याने ट्रकला आग लागल्याची घटना घडली. दरम्यान अग्निशमन दलाच्या वतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.यावेळी आग वेळीच विझवण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान जिल्ह्यातील आज दिवसभरातील आगीची दुसरी घटना आहे.
नंदुरबार जिल्ह्यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण असतानाही दोन आगीच्या घटना घडल्या आहे. प्रकाशा हुन नंदुरबार कडे भारवाड गल्लीमध्ये चारा घेऊन येणाऱ्या ट्रकला नंदूरबार शहरातील इंदिरा मंगल कार्यालय परिसरात विद्युत वाहिन्यांचा स्पर्श चाऱ्याला झाल्याने ट्रकला आग लागल्याची घटना घडली आहे. चाऱ्याने भरलेल्या ट्रकला आग लागल्याने परिसरात एकच धावपळ उडाली. घटनास्थळी तत्काळ अग्निशमन दलाचे बंब पोहोचल्याने पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. या आगीत 70 टक्के चारा जळून खाक झाला आहे. घटनास्थळी बघ्यांची गर्दी मोठ्याप्रमाणावर जमली होती. उपनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कार्यवाही सुरू आहे.