खापर l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील नर्मदा काठावरील मणिबेली व सिंधुरी या ग्रामपंचायती अंतर्गत गावातील अंगणवाडी बांधकाम नियोजित जागेवर झाले नसतांना हि महिला व बालकल्याण सभापती यांचे पतींनी केवळ राजकीय शक्ती वापरुन आपल्या राजकीय सोयीसाठी इमारत मंजूर असलेल्या जागे व्यतीरिक्त दुसऱ्या जागेवर बांधकाम दाखवून दोन अंगणवाड्यांचे बांधकाम बिलांचे धनादेश ग्रामपंचायतीच्या नावे आश्चर्यकारक रित्या वर्ग झाले आहे मात्र अश्या गैरप्रकारे पैसे हडप करण्याच्या प्रकाराला स्थानिक प्रशासकीय अधिकारी हि खतपाणी घालत असुन याबाबत आपण हा गैरप्रकार होऊ नये म्हणून तक्रार मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना केली असल्याबाबत त्यांनी पत्रकार परिषदेत शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य किरेसिंग वसावे यांनी सांगितले
अक्कलकुवा येथील शासकीय विश्राम गृहावर माजी जिल्हा परिषद सदस्य किरेसिंग वसावे यांनी पंचायत समिती सदस्य दुधल्या वसावे, मणिबेली चे सरपंच दिलवरसिंग वळवी, ग्रामपंचायत सदस्य खेत्या वसावे, भरत पाडवी, धनसिंग वसावे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद आयोजित केली होती यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, पिंपळखुटा महिला व बालविकास प्रकल्प अंतर्गत सिंधुरी ग्रामपंचायत मधील चिमलखेडी व मणिबेली ग्रामपंचायत मधील जांगठी येथे अंगणवाडी केंद्र बांधकामाचे ग्रामपंचायतीने ठराव दिल्यानुसार बांधकामांचे कार्यारंभ आदेश जिल्हा परिषद बांधकाम विभाग व उपविभाग पंचायत समिती अक्कलकुवा बांधकाम विभाग यांनी दिले होते. यासाठी पंचायत समिती बांधकाम विभाग अभियंता यांनी नियोजित जागेवर जिओटॅगिंग करुन लाईन आऊट दिले होते. मात्र हे काम ग्रामपंचायतीने करणे अपेक्षित होते मात्र तसे न होता येथील जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती यांचे पती यांनी आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांना हाताशी धरून आपल्या जवळच्या व्यक्तीच्या मालकीच्या जागेवर अगोदर तयार असलेल्या घरांना रंगरंगोटी करुन अंगणवाडी केंद्र दाखवून पंचायत समिती बांधकाम अभियंता, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक यांच्या संगनमताने दोन अंगणवाड्यांचे पैसे हडप करण्याच्या डाव असुन काम झाले नसतांनाही धनादेश ग्रामपंचायतकडे आले असल्याचे पितळ आम्ही उघडकीस आणल्याने आम्हालाच आरोपींच्या जाळ्यात उभे केले आहे याबाबत जिल्हा परिषद अध्यक्ष, तसेच बांधकाम सभापती यांच्या कडे हि तक्रार दाखल केली मात्र बांधकाम सभापतींनी चौकशी करण्यासंदर्भात सांगितले मात्र याकडे जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी,महिला व बालकल्याण प्रकल्प संचालक यांनी सोईस्कर रित्या दुर्लक्ष केले आहे . याबाबत तक्रारी केल्या असतांनाही संबंधितांनी या तक्रारींना केराची टोपली दाखवली असुन एकंदरीत याप्रकरणात संबंधित अधिका-यांचेहि साटेलोटे असल्याचे समजते आहे. तरी संबंधित दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कडे केली असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागातील अंगणवादीकेंद्रे हे बालकांचे हक्काचे मुलभूत केंद्र असून वरिष्ठ पातळीवरील पदाधिकारी हे आपल्या कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी येथील आरोग्य यंत्रणा,बांधकाम यंत्रणा व सर्वच यंत्रणा आपल्या हाताशी धरून नंदुरबार जिल्ह्यातील आकांक्षित समजल्या जाणा-या दुर्गम भागातील जनतेला वेठीस धरण्याचे काम प्रशासनातील अधिका-यांना हाताशी धरून केले जात आहे म्हणजेच दुर्गम भागातील अंगणवाडी केंद्रे हे बालकांचे पोषण आहार केंद्र नसुन कार्यकर्त्यांचे पोषण भरण केंद्र झाली असून कुपोषण वाढ होण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कारणीभूत आहे. स्तनदा माता, गरोदर माता, व बालकांना पुरविण्यात येणाऱ्या आहार व आरोग्य सुविधांमध्ये हि गैरव्यवहार होत असतो याबाबतीत स्थानिक प्रशासकीय यंत्रणेकडे वारंवार तक्रारी दाखल करण्यात आल्या असून संबंधित विभागाचे प्रमुख याकडे दुर्लक्ष करून आपली वेळ मारुन नेत आहेत. एकंदरीत आदिवासी जनतेचे शोषण करण्याचे काम सुरू आहे.
अक्कलकुवा तालुक्यात सिकलसेल, बालमृत्यू, कुपोषण यासारखे प्रकार सुरू असुन बाहेरुन येणारे अधिकारी आपली तुंबडी कशी भरेल व कमी वेळात आपला फायदा कसा करता येईल यात गुंतलेले असुन त्यांना येथील आदिवासींच्या बालमृत्युशी, व कुपोषणाशी काही हि घेणे देणे नसुन अश्या टाळू वरचे लोणी खाणा-या व गैरप्रकारांना खतपाणी घालणाऱ्या अधिका-यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
येथील गटविकास अधिकारी हे सत्ताधारी लोकांची कामे राजकीय दडपणाखाली करत असुन जिल्हा परिषदेतील सत्ताधारी सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांना विश्वासात घेऊन गैरव्यवहार करुन आपली तुंबडी भरतांना दिसत आहेत. सॅममॅम फक्त कागदावर दाखवले जाते, किती बालकांचे मृत्यू झाले याची नोंद कुठेही सापडणार नाही, बालकांचा पोषण आहार काळ्या बाजारात विकला जातो. यासाठी गटविकास अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी सुपरवायझर, सेविका यांच्या सह सर्व यंत्रणा कारणीभूत आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील चिमलखेडी, व जांगठी येथे महिला व बालकल्याण सभापती यांचा कोणताही संबंध नसतांना येथील सरपंच व ग्रामपंचायत यंत्रणेला विश्वासात न घेता प्रशानतातील अधिकारी यांच्यावर आपल्या राजकीय बळाच्या जोरावर आपली पोळी भाजून घेऊन ठरलेल्या जागेवर बांधकाम न करता अंगणवाडी केंद्राचे बांधकामाचे आश्चर्यकारक रित्या धनादेश ग्रामपंचायत कार्यालयात येथील सरपंच यांना कोणत्याही प्रकारचा सुगावा न लागु देता पैसे परस्पर हडप करण्याचा उद्देशाने कोणाच्या आशिर्वादाने जमा झालेत? तरी याची चौकशी करून यंत्रणेतील जबाबदार घटकांवर ताबडतोब कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य किरेसिंग वसावे व ग्रामस्थांनी केली आहे.