नंदूरबार l प्रतिनिधी
वाण्याविहीर ताल. अक्क्कलकुवा येथील व्यापाऱ्यावर हल्ला करुन लुट करणारे 6 जणांना मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.
अक्कलकुवा येथील व्यापारी महेश परमसुख तंवर हे दि. 3 एप्रिल रोजी रात्री 9.15 वाजेच्या सुमारास वाण्याविहिर येथुन त्यांची बुलेट मो. सा. (क्र. MH-39 AF- 7001) हीच्याणे किराणा मालाचे उधारीचे पैसे जमा करून त्यांचे राहते घरी जात होते. जुना वाण्याविहीर फाटा ते मोठी राजमोही गावाचे दरम्यान अंकलेश्वर-बु-हाणपुर महामार्गावरील पुलाजवळ त्यांचे पाठीमागून आलेल्या मोटर सायकलवरील दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या हातातील लाकडी दांडक्याने त्यांना मारहाण करुन त्यांचे मोटार सायकलच्या हॅन्डलला लावलेली 4 लाख ९० हजार रोख रक्कम व उधारी वसुलीचा कागद असलेली बॅग हिसकावुन पळवून नेली. सदरची घटना पोलीसांना कळताच पोलीसांनी केलेल्या सुचनेप्रमाणे फिर्यादी यांनी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाख़ल करण्यात आला होता.
सदरची घटना अत्यंत गंभीर असल्याने नंदुरबार जिल्ह्याचे प्रभारी पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी स्वतः लागलीच घटनास्थळास भेट देऊन झालेल्या प्रकाराची इत्थंभुत माहीती घेऊन अक्कलकुवा पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाख़ेस गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन करुन सुचना दिल्या होत्या.
सदर घटनेमुळे व्यापारी वर्गामध्ये प्रचंड भितीचे वातावरण तयार झाले होते. तसेच त्यांचेमध्ये असंतोष निर्माण झाला होता. त्यामुळे व्यापारी वर्गाने शिष्टमंडळ आणून गुन्हेगारांवर कारवाई व्हावी या उद्देशाने निवेदने देखील दिले होती.
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील हे हैद्राबाद येथे प्रशिक्षणासाठी गेले असतांना त्यांना गुन्ह्याची माहीती मिळताच त्यांनीदेखील गुन्ह्याचे तपासाबाबत सविस्तर सुचना देऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन केले. त्याअनुषंगाने नंदुरबार जिल्ह्याचे प्रभारी पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी 3 पथके तयार करुन गुन्हयाचा समांतर तपास सुरु केला. त्यांनी वाण्याविहीर तसेच आजुबाजुच्या परिसरातुन संशयीत आरोपींबाबत इत्यंभुत माहीती प्राप्त करण्यात येत होती. परिसरातील सराईत गुन्ह्येगारांची धरपकड सुरु करण्यात आली. परंतु 2 दिवस कोणतीही उपयुक्त माहीती मिळत नव्हती. सदर गुन्ह्याचा तपास करीत असतांना नंदुरबार जिल्ह्याचे प्रभारी पोलीस अधीक्षक विजय पवार यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, तळोदा तालुक्यातील सराईत गुन्हेगार भाया उर्फ शिवदास कुवरसिंग पाडवी हा गुन्हा घडल्याच्या रात्री काही लोकांना पैसे वाटत होता. त्यामुळे त्याने हा गुन्हा त्याचे साथिदारासह केला असावा. सदरची माहीती त्यांनी पोनि कळमकर यांना दिली असता ते स्वतः तसेच सपोनि संदिप पाटील असे एका पथकासह आरोपीच्या शोधार्थ तात्काळ तळोदा परिसरात रवाना झाले . सदर ठिकाणी दोन दिवस सातत्याने रोझवा, छोटा धनपुर, नवागाव, बोरद आदी गावांचे परिसरात आरोपीचा शोध घेत होते. परंतु संशयीत आरोपी भाया उर्फ शिवदास कुवरसिंग पाडवी हा मिळुन येत नव्हता. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने तो वारंवार आपले ठिकाण बदलत होता. तिस-या दिवशी गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की संशयीत आरोपी भाया उर्फ शिवदास कुवरसिंग पाडवी हा त्याचे साथिदारासह गुजरात राज्यातील बारडोलीजवळील गंगाधरा गावात लपलेला आहे.
पोलीस पथकाने रात्रीतुन गंगाधरा गाव गाठले. महामार्गालगतचे एका घरात संशयीत आरोपी भाया उर्फ शिवदास कुवरसिंग पाडवी हा त्याचा साथिदारासह लपलेला आहे अशी माहीती मिळाल्याने सदर घराला पहाटे 4 वाजेच्या सुमारास पोलीसांनी सापळा लावून अत्यंत चपळाईने व कौशल्याने त्यांना ताब्यात घेतले. संशयीत आरोपी भाया याच्यासोबत मिळालेल्या दुस-या संशयीत आरोपीचे नाव रामलाल तुलसीदास वसावा रा. काकरपाडा ता. सागबारा. जिल्हा तापी असे समजले. दोन्ही आरोपी हे सराईत असल्याने ते पोलीस पथकास कोणतीही माहीती सांगत नव्हते. पोलीस पथकाने त्यांचेकडे सखोल विचारपुस केली असता त्यांनी त्यांचे इतर 4 साथिदारासंह गुन्हा केल्याचे कबुल करुन गुन्ह्याचा संपुर्ण घटनाक्रम कथन केला.
आरोपींनी दिलेल्या माहीतीवरुन पोलीस पथकाने तात्काळ तेथुनच अंकलेश्वर गाठले. अंकलेश्वर येथे आरोपींचा तिसरा साथिदार नामे जिता उर्फ जितेंद्र नेहरु पाडवी हा त्याचे अस्तीत्व बदलुन वेषांतर करुन राहत होता. सदर आरोपीच्या ठावठीकाण्याबाबत पथकाने माहीती मिळवून त्याचे राहते घरी सापळा लावला. आरोपीस पोलीस पथकाची कुणकूण लागलाच तो घराचे मागील बाजुने भिंतीवरुन उडी मारुन पळुन जाऊ लागला. परंतु पोलीसांनी अत्यंत नियोजन करुन सापळा लावला असल्यामुळे तो भिंतीचे पलीकडे दबा धरुन बसलेल्या पोलीस अंमलदारांचेच ताब्यात जाऊन पडला.
तेथुन पथकाने रामलाल याचे गाव काकरपाडा गाठले. तेथे आरोपींचा चौथा साथीदार राहुल वसावा यास ताब्यात घेण्यात आले. अक्कलकुवा परिसरातुन आरोपींचा पाचवा साथिदार सायरा उर्फ सायर उर्फ सागर राजेंद्र वळवी याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेण्यात आले. आरोपींचा सहावा साथीदार नामे पुनमचंद हरिचंद्र ठाकरे हा तळोदा तालुक्यातील नवागाव येथे शेताचे झोपडीत लपुन बसलेला होता. पथकाने शेतात सापळा लावुन शेतातील झोपडीचे माळ्यावरुन त्यास यास ताब्यात घेतले.
सर्व आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेत आणून प्रभारी पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी स्वतः आरोपींकडे विचारपुस केली. त्यानुसार आरोपी भाया व जिता हे दोन्ही आरोपी सदर रस्तालुटीच्या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार होते. आरोपी जिता याने आरोपी भाया यास व्यापारी महेश तंवर हे दर रविवारी मोठी रक्कम घेऊन वाण्याविहीर येथुन मोटर सायकलने अक्कलकुवा येथे येतात, असे सांगुन दोन्हींनी सदर आरोपीस लुटण्याचा डाव आखला.
संशयित आरोपी जिता याने त्याचा साथिदार सायरा यास महेश तवर यांचेवर लक्ष ठेवून त्याची माहीती भाया यास देण्याची जबाबदारी दिली होती. दि
3 एप्रील रोजी महेश तवर हे वाण्याविहीर येथे आहेत अशी माहिती सायराने भाया यास मोबाईलद्वारे दिली. भाया याने त्याचा साथिदार रामलाल, राहुल, पुनमचंद यांच्यासह महेश तवर हे वाण्याविहीर येथुन अक्कलकुवा येथे जाण्यासाठी निघाले असतांना महामार्गावर मोटरसायकलवर पाठलाग करुन मागुन लाकडी दांडा त्यांचे दिशेने फिरवला. परंतु फिर्यादी यांनी मागे वाकुन तो हुकवला. त्यात फिर्यादी यांचा हात गाडीचे हॅन्डलवरून सुटल्याने मागुन आलेल्या मो. सा. वरील इसमाने फिर्यादी यांचे मोटार सायकलच्या हॅन्डलला लावलेली 4 लाख 90 हजार रु. रोख रक्कम व उधारी वसुलीचा कागद असलेली बॅग हिसकावुन पळून गेले. तेथुन भाया व रामलाल हे भायाच्या गावात आले. तेथे 2 दिवस थांबले तथापि पोलीस तपास करीत असल्याची कुणकुण लागताच तेथुन पोबारा करुन बारडोली जवळील गंगाधरा या गावात येवून लपले. स्थानिक गुन्हे शाख़ेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी आपले कौशल्य वापरुन तपासाची चक्रे वे आरोपी निष्पन्न करुन त्यांचे ठावठिकाणाबाबत माहीती काढुन पथकासह 6 संशयितआरोपी ताब्यात घेऊन दरोड्यासारखा गंभीर गुन्हा अल्पावधीतच उघडकीस आणला. परंतु आरोपी हे गुन्ह्यातील रक्कम देण्यास टाळाटाळ करीत होते. त्यामुळे वरीष्ठांनी सदरचा गुन्हा हा स्थानिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी सोपविला. व जास्तीत जास्त मुद्देमाल हस्तगत करण्याचे आदेशीत केले.आरोपींची पोलीस कोठडी घेऊन गुन्ह्यातील लुटल्या गेलेल्या मुद्देमालापैकी 3 लाख 90 हजार रुपये रोख हस्तगत करण्यात यश मिळविले. याशिवाय आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली 45 हजार रुपये किमंतीची एक स्प्लेंडर मोटर सायकल व 70 हजार रुपये किमंतीची एक होंडा शाईन मोटर सायकल अशा एकूण 2 मोटर सायकली, तसेच आरोपींचे 6 मोबाईल हॅन्डसेट असा एकूण 5 लाख 40 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळविले आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर हे करीत आहेत. संशयित आरोपींकडे मिळालेली स्प्लेंडर मोटर सायकल ही आरोपींनी गुन्हा करण्याच्या उद्देशाने गुजरात राज्यातील दाहोद येथील करजान पोलीस ठाणे हद्दीतुन चोरी केली असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याबाबत करजान पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधिक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप पाटील, पोहवा सजन वाघ, प्रमोद सोनवणे, मुकेश तावडे, पोलीस नाईक विशाल नागरे, सुनिल पाडवी, जितेंद्र ठाकुर, मनोज नाईक चापोना/ रमेश साळुंखे यांचे पथकाने केली आहे. मुद्देमालासह आरोपी अटक करुन अल्पवधीतच दरोड्यासारखा गंभीर गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. बी.जी.शेखर पाटील यांनी विशेष बक्षीस जाहिर करुन नंदुरबार जिल्ह्याचे प्रभारी पोलीस अधीक्षक, नंदुरबार विजय पवार यांचेसह संपुर्ण पथकाचे विशेष अभिनंदन केले आहे.