शहादा | प्रतिनिधी
शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी आलेल्या नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉ.बी.जी. शेखर यांची आ.राजेश पाडवी यांनी भेट घेऊन पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांची तात्काळ बदली करावी यामागणीचे निवेदन दिले.
शहादा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या कार्यालयात आ.राजेश पाडवी, प्रा मकरंद पाटील, अभिजित पाटील यांनी पोलीस उप महानिरीक्षक श्री.शेखर यांची भेट घेतली. यावेळी आ.राजेश पाडवी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, श्रीरामनवमी मिरवणुकीत बँड व ढोल ताशे वाजविण्याबाबत शासन दरबारी निवेदन दिलेले असतांना त्यास मनाई करून बँड जप्त केल्याने शहरातील वातावरण संतप्त आहे. परिणामी शहरात बंद पाळण्यात आला. पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत हे आडमुठे धोरणाचा अवलंब करीत समाजात तेढ निर्माण करतात.शहरातील नागरिकांचा रोष आहे. शहादा शहर जिल्ह्यातले मोठे शहर असून परिस्थिती शांत राहण्यासाठी त्यांची तात्काळ बदली करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी उपविभागीय कार्यालयाच्या आवारात विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, पोलिस उपमहानिरीक्षकांशी बुधवंत यांच्या बदलीबाबत सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच नागरिकांच्या मनातील असलेला रोष दूर होईल असे आ.पाडवी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.