शहादा | प्रतिनिधी
शहादा येथे श्रीरामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीच्या वादावरून झालेल्या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल. कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल. शहर व परिसरात शांतता, कायदा व सुव्यवस्था राखावी, कायद्याचा सर्वांनी आदर करावा, कोणीही कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन नाशिक परिक्षेत्राचे पोलीस
उपमहानिरीक्षक बीजी शेखर यांनी केले.
शहादा शहरात श्रीराम नवमीच्या दिवशी पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी बँडची गाडी जप्त केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. त्यामुळे मिरवणूक रद्द झाली होती. पोलिस प्रशासनाचा निषेध म्हणून शहादा शहरासह लोणखेडा व प्रकाशा येथे बंद पुकारण्यात आला होता. संतप्त रामभक्तांनी व विविध संघटनांनी पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांच्या बदलीची मागणी केली. आ.राजेश पाडवी यांनीही बुधवंत यांच्या बदलीची मागणी करीत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे भेटून निवेदन दिले होते. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य पाहून व १४ एप्रिलला डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीसह इतर जयंत्या, रमजान सण बघता शहरात शांतता राहावी म्हणून श्री.शेखर यांनी शहादा येथे भेट दिली.
कायदा सगळ्यांनी पाळावा कायद्याच्या आदर करा. कायदा हा नेहमीच सज्जनांच्या पाठीशी आहे. शांतता राहिली तर शहराचा विकास होईल कायदा कोणी हातात घेऊ नये. कायदा हातात घेणार्यांची गय केली जाणार नाही. एका धर्मासाठी अथवा जातीसाठी कायदा नाही तो सर्वांसाठी सारखा आहे. सगळ्यांसाठी नियम सारखे आहेत. सगळ्यांनी त्याचे पालन करावे. जिल्हा प्रशासनाने सात ते आठ महिन्यापूर्वीच डीजे व बँड वाजंत्रीबाबत निर्बंध लावलेले होते. सर्वोच्च न्यायालयाचे तसे निर्देश असून संसदेत कायदा पास झाला आहे. पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांच्याबाबतीत योग्य ती चौकशी केली जाईल, चौकशीत दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल, कोणावरही कोणत्याही प्रकारे अन्याय होणार नाही. योग्य तो निर्णय घेतला जाईल. नागरिकांनी कोणत्याही प्रकारे अफवांना बळी न पडता शांतता राखा. पुरेसा पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे. प्रशासनाला सहकार्य करावे असे श्री.शेखर यांनी सांगितले.
यावेळी प्रभारी पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर आदींसह पोलिस अधिकारी उपस्थित होते.