नंदुरबार ! प्रतिनिधी
कोविड-19 मुळे एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात यावा आणि यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हास्तरीय कृती दलाच्या बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकारणाचे सचिव डी.व्ही.हरणे, अपर पोलिस अधीक्षक विजय पवार, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष विठ्ठल कदम, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम, डॉ.राहुल चौधरी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी साईनाथ वंगारी आदी उपस्थित होते.
श्रीमती खत्री म्हणाल्या, बालकांना योजनांचा लाभ देण्यासाठी तांत्रीक बाबी त्वरीत पूर्ण करण्यात याव्यात. कोविड-19 मुळे घरातील कर्ता पुरुष गमावलेल्या महिलांना सामाजिक योजनांचा लाभ देण्यासाठी त्यांची यादी सादर करावी. बाल संगोपन योजनेचा लाभ देण्याबाबत आवश्यक कार्यवाही लवकर पूर्ण करावी.
जिल्ह्यात कोविड-19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या 7 मुलांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत व शैक्षणिक मदत देण्यास बैठकीत मंजूरी देण्यात आली. आतापर्यंत कोविड-19 मुळे एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या 18 वर्षाखालील 217 बालकांपैकी 71 बालकांना सामाजिक तपासणी अहवालानुसार बाल संगोपन योजनेचा लाभ देण्याबाबत आदेश देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
बैठकीस बाल कल्याण समितीचे सदस्य व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.