नंदुरबार। प्रतिनिधी
नकली सोने देवून फसवणूक करणार्या राजस्थानच्या टोळीतील दोघांना धुळ्यात पकडण्यात आले. त्यांच्याकडून रोकडसह 6 लाख 67 हजारांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे. एलसीबीसह पिंपळनेर पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील गुळ व्यापारी दीपक प्रभाकर भामरे रा. शनी गल्ली, पिंपळनेर ता. साक्री यांनी पिंपळनेर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार,ते दि, 18 जुलै रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास त्यांच्या प्रथमेश ट्रेडर्स नावाच्या दुकानात बसलेले होते. तेव्हा एका अनोळखी इसमाने तेथे येवुन, त्यांना त्याच्याकडे असलेले सोन्याचे पदक दाखविले. पैशाची गरज असल्याचे असे सांगुन सोने खरेदी करण्याबाबत विनंती केली. त्यानुसार भामरे यांनी खात्री केली असता ते सोने खरे असल्याची त्यांची खात्री झाली. त्यानंतर त्यांनी अनोळखी इसमासोबत चर्चा केली. त्यानंतर त्या इसमाने स्वतःचे नाव राजु मिस्तरी असे सांगुन मला शेतामध्ये सोने मिळाल्या आहे, असे सांगुन ते विकत घेण्याचा आग्रह केला. त्यास भामरे यांनी होकार दिल्यानंतर त्या इसमाने त्यांना दि. 30 जुलै रोजी साक्री येथे बोलवून त्यांच्याकडून 4 लाख रुपये घेवून त्यांना दिड किलो बनावट सोन्याचे ओम पान देवुन तेथुन पोबारा केला. तत्पुर्वी दि. 29 जुलै रोजी पंकज हिरामण गंगावणे रा.अलियाबाद ता. सटाणा जि.नाशिक यांच्याकडुन सुध्दा त्या इसमाने अडीच लाख रूपये घेवुन त्यांना बनावट सोने देवुन त्यांचीही फसवणुक केली होती. वरील दोन्ही घटनेबातत पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. तक्रारदार हे पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आल्यानंतर सपोनि साळुखे यांनी खात्री करुन त्यांना अनोळखी इसम हे धुळयाचे दिशेने गेल्याची माहिती भेटली असता, त्यांनी एलसीबीचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना कळविले. त्यानुसार त्यांनी पथकासह धुळे शहरासह परिसरात वर्णनानुसार इसमांचा शोध सुरू केला. त्यादरम्यान माहिती मिळाली की, साक्री बायपास रोडवरील भंडारा हॉटेलच्या पाठीमागे काही लोक नव्याने पाल टाकुन तेथे राहण्यास आले आहे. त्यानुसार पथकाने तेथ छापा टाकला असता दोन इसम पळुन गेले. तर जितेंद्रकुमार लालारामजी वाघोला रा. पंचायत वाली गली बागरा, तहसिल, जि. जालोर, राजस्थान व मांगीलाल हिराराम वाघरी रा. बागरीयो का वास सिवणा, तहसिल जि. जालोर, राजस्थान यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांच्याकडून गुन्ह्यात गेलेली 6 लाख 46 हजार 500 रूपयांची रोकड व 1 किलो 632 ग्रॅम वजनाचे पिवळया रंगाचे धातुचे ओम पान, 964 ग्रॅम वजनाचे पिवळया रंगाची धातुची माळ, पांढन्या रंगाचा इलेक्ट्रीक वजन काटा, 7 मोबाईल, आधारकार्ड असा एकूण 6 लाख 67 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल मिळाला हस्तगत करण्यात आला. त्यांची चौकशी सुरू असून त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत,सपोनि सचिन साळुंखे, सपोनि दिलीप खेडकर, पोसई सुशात वळवी, पोहेकाँ प्रभाकर बैसाणे, रफिक पठाण, पोना अशोक पाटील, संदीप सरग, गौतम सपकाळे, राहुल सानप, पोकाँ मयुर पाटील, तुषार पारधी, श्रीशैल जाधव, सुनिल पाटील, मनोज महाजन, कविता देशमुख, भूषण वाघ, रविंद्र सुर्यवंशी यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.