नंदूरबार l प्रतिनिधी
साक्री तालुक्यातील कळंभीर येथील रहिवाशी जगन मारणार (वय 52) यांचा गुरुवारी रात्री आठ वाजता अपघात झाला. त्यात ते गंभीर जखमी झाल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

जगन मारनर हे कळंभीर गावाकडून शेवाळी फाट्याकडून घराकडे त्यांच्या मोटरसायकल (क्रमांक एम. एच. 18, 2746) ने जात असताना समोरून येणार्या ईनोवा कारने (क्रमांक एम. एच. 5, 7268) जोरदार धडक दिली. यात जगन मारनर यांना गंभीर दुखापत झाली. प्रारंभी त्यांना साक्री येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र पुढील उपचारासाठी त्यांना धुळे येथील हॉस्पिटलला हलविण्यात आले. परंतू डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
अपघात झाला त्या ठिकाणी कळंभीर गावातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. अपघातातील इनोवा कार कोणाची आहे, त्यात कोण बसलेले होते, याबाबत उपस्थित नागरिकांनी विचारपूस केली असता त्या गाडीत नंदुरबार येथील प्रकल्प अधिकारी मिनल करणवाल असल्याचे कळले त्यांनाही किरकोळ दुखापत झाली होती. संबंधित महिला अधिकार्यांबरोबर एक पोलीस शिपाई असल्याचे कळले.
आज साक्री पोलीस स्टेशन येथे संबंधित इनोवा कार चालक रोशनकुमार मोरे रा. नंदुरबार यांच्यावर व गाडीतील संबंधित अधिकार्यांवर गुन्हा दाखल करावा यासाठी आज साक्री पोलीस स्टेशन येथे कळंभीर गावातील मृत इसमाचे नातेवाईक व गावकर्यांनी गर्दी केली.
संबंधितांवर गुन्हे दाखल केल्याशिवाय मयतावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका मयताच्या नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी धरल्यामुळे साक्री पोलीस स्टेशन समोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस इन्स्पेक्टर अजय चव्हाण करत आहेत.








