नंदुरबार l प्रतिनिधी
समाजकल्याण विभागाच्या विशेष घटक योजनेतील निधीचा विनियोग करण्यात नंदुरबार जि.प.चा समाजकल्याण विभाग राज्यात अव्वल ठरला आहे. वेळोवेळी पाठपुरावा केल्याने विशेष घटक योजनेतील सन २०२१-२२ मधील ७ कोटी १५ लाख रुपये इतक्या रकमेचा निधी १०० टक्के खर्च झाल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे व समाजकल्याण अधिकारी श्री. नांदगावकर यांनी समाजकल्याण सभापती रतन पाडवी यांचा सत्कार केला.

समाजकल्याण विभागांतर्गत विशेष घटक योजनेसाठी नंदुरबार जि.प.ला ७ कोटी १५ लाख रुपये इतका निधी प्राप्त झाला होता. सदर निधीच्या माध्यमातून दलीत वस्तीत रस्ते, पेव्हरब्लॉक, स्वच्छतागृह, समाज मंदिर आदी कामे करण्यात येतात. सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात समाजकल्याण सभापती रतन पाडवी यांनी जि.प.च्या सर्वसाधारण सभा, स्थायी सभा आदींच्या माध्यमातून वेळोवेळी पाठपुरावा करत मंजूरी दिल्याने सदर निधी खर्च झाला आहे. जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे व समाज कल्याण अधिकारी श्री.नांदगावकर यांनी योग्य नियोजन व सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्याने मार्च एंडअखेर १०० टक्के निधी खर्च करण्यात समाजकल्याण विभागाला यश मिळाले आहे. एकूण ७ कोटी १५ लाख इतका १०० टक्के निधी खर्च करण्यात आला आहे. यामुळे जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे व समाजकल्याण अधिकारी श्री.नांदगावकर यांनी समाजकल्याण सभापती रतन पाडवी यांचा सत्कार केला.
सदरच्या निधीच्या माध्यमातून सन २०२१-२२ मध्ये जोडरस्ते व दिवाबत्तीसाठी ६० लाख रुपये, वस्तीगृहांना सीसीटीव्ही बसविण्यासाठी २४ लाख ९५ हजार रुपये खर्च करण्यात आले आहे. यासोबतच समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून १२० दिव्यांगांना झेरॉक्स मशिनसाठी १ कोटी २० लाख तसेच ५ टक्के दिव्यांग कल्याणकारी योजनेतून झेरॉक्स मशिन वाटपासाठी १५ लक्ष खर्च करण्यात आले आहे. तर सन २०२०-२१ मध्ये मागासवर्गीय शेतकऱ्यांना सौरउर्जेवर चालणाऱ्या विविध वस्तूंसाठी ४ कोटी ७० लक्ष रुपये इतका निधी खर्च झाल्याची माहिती समाजकल्याण विभागाच्यावतीने देण्यात आली.








