नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत मिरची नंतर गव्हाला चांगला भाव मिळाला असून 973 वाण गहूची उच्चांकी प्रति क्विंटल 5 हजार 451 दराणे आज विक्री झाली. गव्हाची आवक वाढली असून आज बाजार समितीत १५० वाहनांमधून ३ हजार क्विंटलची आवक झाली होती.
नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत लालेलाल मिरचीची आवक घटल्यानं तर गहू, दादर, मका, हरभरा पिकांची आवक वाढली आहे. तळोदा, नंदुरबार, शहादा तालुक्यातील तापी काठावरील गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या गहु पिकाची काढणी सुरू झाली असून रोज दीडशे ते दोनशे वाहनांमधून गहू विक्रीसाठी येत आहे. तापी नदी काठावरील उत्पादित गव्हाची चांगली चव असल्याने मागणीही मोठ्या प्रमाणावर आहे. त्याचप्रमाणे गहू पिकाचे लोकप्रिय वाण ९७३, ग्रीनगोल्ड, लोकवन या गहूला खाणाऱ्यांची मागणी वाढल्याने चांगला शेतकऱ्यांना चांगला दर मिळत आहे.
नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत आतापर्यंत गहू पिकाला सर्वाधिक उच्चांकी दर मिळाला आहे छडवेल येथील देविदास पोपट पाटील या शेतकऱ्याच्या 973 गहू वाणाला 5 हजार 451 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. एकूण सात क्विंटल गहू विक्रीसाठी आणला होता. 973 गहू वाण चवीला उत्तम व खाण्यासाठी उपयुक्त असल्याने मोठी मागणी आहे. या वाणाला बन्सी गहू या नावानेही ओळख आहे.
नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती गेल्या वर्षी जवळपास एक लाख क्विंटल गव्हाची आवक झाली होती, यंदा गहू पिकाची आवक वाढल्याने 1 लाग क्विंटल पेक्षा अधिक आवक येणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हिरालाल मक्कन पाटील यांनी दिली आहे. सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीत गहूच्या वेगवेगळ्या वाणांना दर्जानुसार 1900 पासून तर 2600 रुपये पर्यंत दर मिळत आहे. गतवर्षीपेक्षा यंदा गहू पिकाला चांगले दर मिळत आहे.