म्हसावद l प्रतिनिधी
बामखेडा येथील ग्राम विकास संस्थेच्या कला महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख प्रा. वाय.सी. गावित यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची पीएचडी पदवी प्राप्त झाली.
प्रा.गावित यांनी ब्रिटिश राजवटीचा खानदेशातील भिल्ल आदिवासी जमातीच्या समाजजीवनावर पडलेला प्रभाव या विषयावर संशोधन केले व आपला प्रबंध सादर केला. त्यासाठी प्रा. गावित यांनी मुंबई, पुणे, इत्यादी ठिकाणातील ब्रिटिश कागदपत्रांचा अभ्यास केला. विविध ठिकाणांना प्रत्यक्ष भेटी देऊन, आदिवासी सामाजिक कार्यकर्त्यांची मुलाखत घेऊन आपले संशोधन कार्य पूर्ण केले. ब्रिटिश आमदानीत व स्वातंत्र्योत्तर काळात आदिवासींना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी झालेल्या प्रयत्नांचा शोध याबाबत प्रबंधात विवेचन केले आहे. त्यांना पीएचडी साठी नवलनगर येथील डॉ. एस. जी. पाटील यांनी मार्गदर्शन केले. प्रस्तुत संशोधन कार्य पूर्ण करण्यासाठी डॉ. एस.ए. पाटील, डॉ. संजय शिंगाणे, डॉ.राजविरेंद्रसिंग गावित, डॉ. डी.एल. पावरा यांचे विशेष सहकार्य लाभले. डॉ. गावित यांनी प्राप्त केलेल्या यशाबद्दल ग्राम विकास संस्थेचे अध्यक्ष श्री पी.बी. पटेल,उपाध्यक्ष डॉ.के. एच. चौधरी ,संस्थेचे सचिव श्री बी.व्ही. चौधरी, प्राचार्य डॉ.एस. पी.पाटील आणि सर्व प्राध्यापक व प्राध्यापककेतर वर्ग तसेच हितचिंतकांनी अभिनंदन केले आहे.