म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील बामखेड़ा येथील शेतकरी विकास सोनार व त्यांचे सुपुत्र किरण सोनार यांनी आपल्या कृषी ज्ञानाच्या आधारावर व अनुभवावर आधुनिक शेती करत केळीची लागवड केली. पूर्णवेळ शेतीत खर्च केला. वेगवेगळे प्रयोग, तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन आपली केळी इराण, अफगाणिस्तान दुबई या आखाती देशांमध्ये पाठविली. शेतीत नेहमी वेगळे वेगळे प्रयोग करून जिद्दीच्या बळावर सातासमुद्रापार केळी पोहोचवली.
शहादा तालुक्यात बहुतांश शेतकरी प्रयोगशील शेती करीत असून विविध प्रकारचे पिके घेऊन उत्पादित झालेल्या मालाच्या सातासमुद्रापार झेंडा रोवला आहे. त्यातच बामखेडा (ता. शहादा )येथील विकास सोनार यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत नवीन काहीतरी करण्याची जिद्द उराशी बाळगून आहे, त्या ज्ञानाचा वापर व तज्ञांकडून मार्गदर्शन घेऊन शेती कसणे सुरू केले त्यात त्यांनी बामखेडा शिवारात असलेल्या एकूण क्षेत्रापैकी पाच एकरात जैन केळी प्रकाराच्या सुमारे सहा हजार केळीच्या रोपांची ठिंबक सिंचनावर लागवड केली.आतापर्यंत सुमारे 120 .टन माल विक्री गेला असून एका केळीच्या घडाचे वजन 42 ते 45 किलो वजन आहे.लागवडीनंतर पुरेसे शेतीचे ज्ञान नसल्याने तज्ञांकडून माहिती मिळवण्यात कोणताही कमीपणा मनात ठेवला नाही. विविध आधुनिक पद्धतीचा अवलंब करून केळीची बाग फुलविली त्यात बाग पाहून अनेकांनी भेटी दिल्या तर काहींनी मार्गदर्शन केले. केळीला सध्या पंधराशे रुपयांहून अधिक दर मिळत असून केळीच्या दर्जा पाहून अधिकाधिक भाव मिळत असतो. परिसरात असलेल्या लोकल मार्केट पेक्षा निश्चितच भाव जास्त मिळतो, त्यामुळे शेतकऱ्याला ही दोन पैसे जास्त मिळत असल्याने परदेशात निर्यात वाढली आहे.
परिसरातून केळी आखाती देशात
जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर केळीची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे.केळीच्या दर्जानुसार केळीची तोडणी होते. तोडणी केल्यानंतर बॉक्स पॅकिंग करून गाडी भरली जाते. थेट नासिक रवाना झाल्यानंतर 13 अंश सेल्सिअस तापमानापर्यंत ठेवले जाते. तद्नंतर बंदरावर कंटेनरमध्ये भरुन जहाजाद्वारे आखाती देशांमध्ये रवाना होते. एका हंगामात जिल्ह्यातून तून विविध खरेदीदार कंपन्यांकडून सुमारे दीड हजार कंटेनर केळी आखाती देशात पाठवली जाते.
योग्य नियोजन, मेहनत
शेतकरी विकास सोनार यांनी ऊस, पपई, मिरची या पिकासोबत पाच एकरात लागवड केलेल्या केळीच्या बागेकडे विशेष लक्ष देत रोपांचा लागवडीपासून ते काढणीपर्यंत सनराईज कंपनी तरडी जि जळगाव चे व्यापारी हिम्मत दत्तात्रय पाटील . तसेच शहादा येथील अविष्कार ॲग्रो एजन्सी चे संचालक जाकीर शहायांचे मार्गदर्शन घेऊन त्यांनी वेळोवेळी सुचविलेल्या उपयांनुसार रोपांची वाढ होण्यासाठी खतांची मात्रा व पाण्याचे योग्य नियोजन करून केळीची बाग फुलविली. केळीच्या लॉट रवाना करण्यात आला असून अजून मोठ्या प्रमाणावर केळी बागेत शिल्लक आहे. आखाती देशात केळी निर्यात होत असल्याचा मनस्वी आनंद होत असल्याचे श्री.सोनार सांगतात.