नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील पानबारा शिवारातील रस्त्यावरुन जात असतांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने पादचारी तर तळोदा-शहादा रस्त्यावर महावितरण उपकेंद्राजवळून दुचाकीने जात असतांना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.२९ रोजी सकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास सुमारे ६० वर्षीय इसम पानबारा शिवारातील हॉटेल आंध्र पंजाबजवळून रस्त्याने पायी जात होता.यावेळी एका अज्ञात वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगाने चालविले.यात पादचाऱ्यास धडक दिल्याने गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला तर वाहनचालक मात्र घटना स्थळावरुन पसार झाला.याबाबत नवापूर तालुक्यातील उचीशेवडी येथील पोलीस पाटील मोतीराम मौल्या गावित यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात वाहन चालकाविरोधात विसरवाडी पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०४(अ),२७९,३३७,३३८ सह मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोहेकॉ.अरुण कोकणी करत आहेत.दुसऱ्या घटनेत शहादा तालुक्यातील सोनवद कवळीथ येथील गुलाब सुकलाल गोसावी(वय ३७) हे दुचाकीवरुन क्र.(जीजे ३४ ए ८६८४) महावितरणच्या उपकेंद्राजवळून जात असतांना अज्ञात आयशर चालकाने त्याच्या दुचाकीला धडक दिल्याने अपघात घडला.यात गुलाब गोसावी यांच्या डोक्यावरुन वाहनाचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.वाहनचालक मात्र अपघात घडल्यानंतर घटनास्थळावरुन पसार झाला.याबाबत सोनवद कवळीथ येथील दारासिंग नागो गोसावी यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात आयशर चालकाविरोधात शहादा पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०४(अ),२७९,३३७,३३८,४२७ मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील करत आहेत.








