शहादा | प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील शहाणे वनक्षेत्रातील लंगडी भवानी गावा शिवलगत वन विभागाच्या क्षेत्रात असलेल्या शेकडो झाडांची कत्तल केल्याप्रकरणी वन विभागाच्या वरिष्ठ पातळीवर दखल घेवून ८७ आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुरुवारी पहाटे वन विभाग व पोलिस प्रशासनाच्या ताफ्यासह शहाणा गावात धाड टाकत सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना दुपारी न्यायालयात हजर केले असता सातही आरोपींना पाच दिवस वन कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात वृक्षतोड करणार्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
शहादा तालुक्यातील पूर्व आदिवासी भागातील मंदाने, शहाणे, जयनगर वनक्षेत्रात सुमारे १८ ते २० हजार हेक्टर वन जमीन आहे. वनसंरक्षकांकडून सुमारे बाराशे ते पंधराशे वनक्षेत्रावर वृक्षाची लागवड करण्यात आली आहे. दूधखेडा येथे स्वतंत्र रोपवाटिका आहे. या परिसरात दर्याखोर्या टेकड्या पडीक जमीन जंगल पसरलेले आहे. गेल्या आठवड्यात शहाणे, बोरपाणी वनक्षेत्र ५७२ व ५७३ या भागात शे-सव्वाशे लोकांनी लहान मोठ्या झाडांची वृक्षाची सर्रास कत्तल केली आहे. शासन वन विभाग यांच्या परवानगीशिवाय वृक्षतोड करून त्या जागेवर विना परवानगी अतिक्रमण करण्याचा घाट या लोकांचा होता. वृक्षाची कत्तल करणारा भाग लंगडी भवानी वनक्षेत्रात येत असल्याने तेथील ग्रामपंचायत वनसंरक्षण समिती तसेच ग्रामस्थांनी याप्रकरणी शहादा उपवनसंरक्षक यांच्याकडे लेखी तक्रार करून वृक्षांची कत्तल करणार विरुद्ध कायदेशीर कारवाई करून अटक करण्याची मागणी केली होती. याप्रकरणी वनक्षेत्रपाल शिवाजी रत्नपारखे, नंदुरबार वनक्षेत्रपाल मनोज रघुवंशी, शहादा वनक्षेत्रपाल एस.के.खुणे, जयनगर वनपाल जगदाळे शहाणे येथील वनपाल राजपूत, वनपाल युवराज भाबड, व अधिकारी कर्मचारी असा सुमारे ८० ते ९० कर्मचार्यांच्या ताफ्याने घटनास्थळी जाऊन वृक्षांची मोजणी केली असता सुमारे बाराशे ते चौदाशे वृक्षतोड झाल्याची प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
वनक्षेत्रातील वृक्षतोड केल्याप्रकरणी दै.देशदूतमध्ये वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. त्याची दखल घेवून आज गुरुवारी पहाटे वन विभागाचे उपवनसंरक्षक के.बी.भवर, सहाय्यक वनसंरक्षक धनंजय पवार, वनक्षेत्रपाल एस के खुणे यांच्यासह पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी दहा ते बारा वाहनांनी ताफ्यासह शहाणा गावात आरोपींच्या वसाहतीत धाड टाकली. यावेळी सात जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध भारतीय वन अधिनियम १९२७ कलमान्वये अटक करण्यात आली आहे. सातही आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवस वन कोठडी देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उर्वरित आरोपींनाही लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे वनक्षेत्रपाल एस.के.खुणे यांनी सांगितले.
दरम्यान, लंगडी भवानी गावालगतच्या वनजमिनीवरील वृक्षांची कत्तल झाली आहे. यात बांबू, कडुलिंब व काही ठिकाणी सागवानी झाडांची तोड झालेली आहे. या वृक्षांची तोड करणार्या आरोपींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी ग्राम समिती ग्रामपंचायत व वनसरक्षण समितीने केली आहे. या ठिकाणी वन विभागाकडून वृक्ष लागवड करण्याची मागणी केली आहे. वन क्षेत्र असलेल्या भागात संपूर्ण तार कंपाउंड करण्यात यावे तसेच या परिसरात स्वतंत्र चेक पोस्ट करण्याची मागणीदेखील करण्यात आली.