नवापुर ! प्रतिनिधी
तालुक्यातील रायंगण,रंगावली नेसू, सरफणी या प्रमुख नद्या आहेत. या नदीवर सिंचनासाठी पाटबंधारे विभागामार्फत बंधारे बांधण्यात आले आहे. उन्हाळ्यात पाणी अडविण्यासाठी या लघु बंधार्यावर लोखंडी फळ्या टाकून पाणी अडवले जाते.परंतु पावसाळा सुरू होऊन देखील या लोखंडी फळ्या काढण्यात आल्या नाही. मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर बंधारे फुल होतील परिणामी बंधारा देखील फुटू शकतो.आजूबाजूतील शेताला व गावातील ग्रामस्थांना धोका निर्माण होऊ शकतो अनेक घरे,शेती,पशुधन वाहून जाऊ शकते किंवा बंधारा फुटल्याने मोठी जीवितहानी होऊ शकते या अनुषंगाने संबंधित विभागाने या पाट्या काढणे गरजेचे होते परंतू तसे न करता विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष दिसून येत आहे.
नवापुर तालुक्यातील रायंगण नदीवर होलीपाडा नजीक लघु बंधार्यावरील फळ्या न काढल्याने मोठा पाऊस असल्यास शेतकर्यांना व गावकर्यांना याचा धोका निर्माण होऊ शकतो. शेजारील शेतातील पीक, घरे, गाय म्हशी देखील यात वाहून जातील असा दावा शेतकर्यांनी केला आहे.
याबाबत पाटबंधारे अभियंते वट्टे यांना विचारणा केली असता त्यांनी अजब-गजब उत्तर दिले टेंडर टाकण्यात आले आहे टेंडर ओपन झाल्यास वर ठेकेदाराकडून हे काम केले जाईल जुलै महिना संपला असला तरी पाट्या काढण्याचे टेंडरचे मुहूर्त पाटबंधारे विभागाला मिळेना.पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली यात मोठी दुर्घटना घडल्यास संबंधित विभागास जबाबदार धरून त्यांच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केले जाईल अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे. याबाबत वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.