तळोदा l प्रतिनिधी
तळवे ते आमलाड गावादरम्यान असणाऱ्या पेट्रोल पंपनजीक चारचाकी गाडीचा टायर फुटल्याने गाडी झाडावर आदळून झालेल्या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले आहेत.हा अपघात शुक्रवारी दुपारी ११ वाजेच्या सुमारास झाला.जखमीना पुढील उपचारासाठी नंदूरबार येथिल खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,तळोदा तालुक्यातील धवळीविहिर येथिल राहणारे महेंद्र रामा ठाकरे,शेवंती हेमंत ठाकरे,यांच्यासह अन्य दोन महिला या घरभरणीच्या कार्यक्रमाला तुळजा येथे जात होते.बोरदकडे जातांना आमलाड गावाच्या पुढे असणाऱ्या पेट्रोलपंपनजिक त्यांची ब्रिझा कार (क्र. एम. एच.03, सी.बी. 5943) आली असता गाडीचा पुढचा टायर फुटला.त्यामुळे चालक महेंद्र ठाकरे यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडी रस्त्याच्या शेजारी असणाऱ्या झाडावर जाऊन आढळली.
या अपघातात चालक महेंद्र ठाकरे याला छातीला दुखापत झाली आहे तर शेवंतीबाई ठाकरे यांच्या शिवाय अन्य दोघा महिलांना डोक्याला दुखापत झाली आहे. त्यांना पुढील उपचारासाठी नंदूरबार येथिल खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.एयर बॅग उघड्यामुळे अपघातात जीवित हानी झाली नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.










