नंदुरबार l प्रतिनिधी
आदिवासी विकास विभागातर्फे भारतीय संविधानाचे अनुच्छेद 275(1) अंतर्गत एकात्मिक कृषी विकास कार्यक्रम संलग्न ( पशुसंवर्धन, फिशरी, डेअरी डेव्हलपमेंट ) उपक्रमाअंतर्गत आदिवासी वनपट्टाधारक शेतकऱ्यांना शेतीस पुरक व्यवसाय म्हणून दहा शेळ्या व एक बोकड पुरविणे या योजनेचा लाभ देण्यासाठी तळोदा प्रकल्प कार्यक्षेत्रातील तळोदा,अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील अनुसूचित जमातीतील वनपट्टाधारक लाभार्थ्यांकडून 8 एप्रिल 2022 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.
शेळी गट व्यवसायासाठी लाभार्थी अनुसूचित जमातीचा असावा. लाभार्थ्याकडे वनपट्टा प्राप्त प्रमाणपत्र असावे, अर्जासोबत रहिवास दाखला, आधार कार्ड, ग्रामसभेचा ठराव, नजीकच्या काळातील दोन पासपोर्ट साईज फोटो, आधार संलग्न बँक खाते क्रमांक, दारिद्र्य रेषेखालील उत्पन्नाचा दाखला, विधवा महिला, दिव्यांग असल्याचा दाखला इत्यादी कागदपत्रे आवश्यक राहील. यापुर्वी इतर शासकीय योजनामधुन लाभ न घेतल्याचे स्वयंघोषणापत्र, तसेच वनहक्क प्रमाणपत्रामध्ये एकापेक्षा जास्त व्यक्तींचे नावे असल्यास एकाच व्यक्तीने लाभ घेणे आवश्यक असून इतर सदस्य ज्या व्यक्तींच्या नावावर योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे त्याचे संमतीपत्र आवश्यक राहील.अधिक माहिती व अर्जासाठी (सुटीचे दिवस वगळून ) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय,शासकीय दुध डेअरीच्या मागे,शहादा रोड, तळोदा जि.नंदुरबार येथे सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ.मैनाक घोष यांनी प्रसिद्धीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.








