नंदुरबार ! प्रतिनिधी
प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांचा गौरव करण्यासाठी कृषि विभागातर्फे पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील भात, तुर, मुग, उडीद, मका, ज्वारी, बाजरी, नाचणी (रागी), सोयाबीन, सुर्यफुल व भुईमुग या प्रमुख पिकांसाठी पिकस्पर्धा होणार असून या पिकांसाठी अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट 2021 तर मुग व उडीद पिकांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2021 अशी आहे.
पिकांच्या उत्पादकता वाढवण्याकरीता शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात. या प्रयोगाच्या माध्यमातून उत्पादकतेत वाढ होत असते. प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिल्यास त्यांच्याकडून उमेदीने नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर होण्याची शक्यता असते. कृषि क्षेत्रातील अशा प्रयोगांच्या माध्यमातून परिसरातील इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन व्हावे तसेच उत्पादनातही मोलाची भर पडावी या उद्देशाने पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.
पीकस्पर्धेसाठी सर्व शेतकऱ्यांना भाग घेता येणार असून पीकस्पर्धेत सहभागी होण्याकरीता शेतकऱ्यांना सर्वसाधारण गट व आदिवासी गटासाठी प्रवेश शुल्क तीनशे राहील. अधिक माहितीसाठी तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा तसेच अधिकाधिक शेतकऱ्यांनी पीक स्पर्धेत सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी निलेश भागेश्वर यांनी केले आहे.