नंदूरबार l प्रतिनिधी
तळोदा येथे ट्रॅक्टर चोरीच्या इराद्याने भरधाव वेगाने ट्रॅक्टर हाकणाऱ्या मद्यधुंद चालकाने हातोडा रस्त्यावरील दोन युवकांना धडक देऊन गंभीर जखमी केले. ट्रॅक्टर चालकापासून वाचण्यासाठी गंभीर जखमी अवस्थेतील युवकांनी लंगडत लंगडत तळोदा उपजिल्हा रुग्णालय गाठले. तर दुसरीकडे शहरातील तरुणांनी परिसर पिंजून काढत व्यावल गावाजवळ त्या चालकाला पकडून ठेवत ट्रॅक्टर ताब्यात घेतले.
याबाबत अधिक माहिती अशी की तळोदा येथील माजी उपनगराध्यक्ष अनुपकुमार उदासी यांच्या वडिलांच्या मालकीचे महिंद्रा कंपनीचे ट्रॅक्टर (क्र.एम.एच.३९.ए.बी.५८४१) तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ उभे होते. हे ट्रॅक्टर एका अज्ञात इसमाने चोरीच्या इराद्याने तेथून घेऊन जाऊन हातोडा रस्तामार्गे भरधाव वेगाने पळवले. त्याच वेळी दुचाकीवरून उंटावद रस्त्यावर शेतात जाणारे दोन युवक रोशन पिंपरे व चेतन वाघ हे बालबाल बचावले. या दोन्ही युवकांनी त्या ट्रॅक्टर चालकाला न्यायालय इमारतीजवळ हटकले असता त्या ट्रॅक्टर चालकाने त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घातले.
या अपघातात मोटार सायकलचा अक्षरशः चुराडा झाला तर दोन्ही युवक बाजूच्या शेताजवळील कुंपणात जाऊन पडले. असे असले तरी कुंपणात देखील ट्रॅक्टर चालकाने त्यांच्यावर ट्रॅक्टर चालवण्याचा प्रयत्न केला. दोन्ही युवक जखमी अवस्थेत तळोदा उपजिल्हा रुग्णालयात पर्यंत आले व त्यांनी फोन करून आपबिती कथन केली. तातडीने तरुणांचा जमाव घटनास्थळी दाखल झाला व त्यांनी ट्रॅक्टर चालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ट्रॅक्टर चालकाचे नाव राजु ठाकरे असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे या थरारक घटनेत एकीकडे रोशन पिंपरे व चेतन वाघ हे दोन्ही युवक गंभीर जखमी होऊन बालबाल बचावले तर अनुप कुमार उदासी यांचे सुमारे पाच लाख रुपये किमतीचे ट्रॅक्टर मिळून आले. दोन्ही युवकांवर नंदुरबार येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.








