नंदुरबार l प्रतिनिधी
सातपुडा पर्वत आणि होळी यांचे अतूट नाते. होळी म्हटली की, आदिवासी बांधवांमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण होते. सध्या सातपुडा पर्वत रांगेत होलिकात्सोवाचा ढोल आणि घुंगुर माळांचा गजर सुरू असतानाच माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय, नंदुरबारतर्फे या भागात दोन वर्षे जनसेवेची महाविकास आघाडीची या प्रसिद्धी मोहिमेचा जागर कलापथकांच्या माध्यमातून सुरू आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारला दोन वर्षे नुकतीच पूर्ण झाली. यानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे दोन वर्षे जनसेवेची, महाविकास आघाडीची ही प्रसिद्धी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून जिल्हा माहिती कार्यालय, नंदुरबार यांच्या वतीने जिल्ह्यात ही मोहीम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेसाठी नंदुरबार जिल्ह्यातून आपकी जय बहुउद्देशीय संस्था, जय आदिवासी जनजागृती मंडळ, युवा रंग फाउंडेशन या संस्थांची निवड करण्यात आली आहे. या संस्था स्थानिक बोलीभाषा तसेच लोककलेच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या सरकारने गेल्या दोन वर्षात राबविलेल्या विविध योजनांची गावोगावी माहिती देत आहे.
या लोककला पथकातील कलावंत पावरी, कोकणी, मावची आणि अहिराणी भाषेतून सरकारने राबविलेल्या जन कल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांना देत आहे. होळी सणासाठी या भागातील नागरिक आपल्या मुळगावी परतल्याने या कार्यक्रमांना नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम असलेल्या धडगाव, अक्कलकुवा, तळोदा, नवापूर या तालुक्यासह जिल्हाभरातील स्थानिक नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहेत.
या योजनांमध्ये प्रामुख्याने आदिवासी बांधवांना खावटी किट वाटप, शिवभोजन योजना, कोरोनामुळे बाधित रुग्णांवर शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार, आरोग्य यंत्रणांचे बळकटीकरण, शेतकऱ्यांसाठी विकेल ते पिकेल अभियान, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, इमारत बांधकाम कामगारांना कोरोना काळात प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत, कामगार विभागातर्फे घरेलू कामगारांना मदत, रिक्षा चालकांना मदत, कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना पाच लाख रुपयांची मदत, माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार कोरोनामुळे मयत झालेल्या नागरिकांच्या नातलगांना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राबविण्यात येत असलेली लसीकरण मोहिम, मोफत अन्नधान्य योजनांसह कृषि, शिक्षण, आदिवासी विकास, महिला व बालविकास आदि योजनांची माहिती देण्यात येत आहे.