नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार शहरातील जुनी महानगरपालिका व नवापूर शहरातील सुमाणिक चौकात पूर्व परवानगी न घेता निषेध आंदोलन केल्याप्रकरणी सुमारे ३० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार शहरातील जुनी महानगरपालिका चौकात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करीत कोणतीही पूर्व परवानगी न घेता विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी फौ.प्र.स.क. १६० प्रमाणेची नोटीस बजावणी केल्याने त्याच्या निषेधार्थ व कोरोना विषाणू प्रादूर्भाव अनुषंगाने सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता निषेध आंदोलन केल्याप्रकरणी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष विजय चौधरी, राजेंद्र गावित, सपना अग्रवाल, नरेंद्र भिमराव माळी, हर्षल वकील पाटील, लियाकत बागवान, राहूल संतोष चौधरी, भिमसिंग राजपूत, प्रशांत कन्हैय्यालाल चौधरी, संगिता सोनवणे, रत्नदिप अरविंद पाटील यांच्यासह ८ ते १० कार्यकर्त्यांविरोधात नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात १८८, २६८, २६९, २९०, महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक जाधव करीत आहेत. तसेच नवापूर शहरातील सुमाणिक चौकात पूर्व परवानगी न घेता निषेध आंदोलन केल्याप्रकरणी भरत गावित, एजाज करीमुद्दीन शेख, प्रणव विवेक सोनार, जयंतीलाल अग्रवाल, जाकीर पठाण, अजय गावित, सौरभ भामरे, निलेश प्रजापत व महेंद्र दुसाणे यांच्याविरोधात भादंवि कलम २६८, २६९, २९० सह महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. विकास पाटील करीत आहेत.