चिनोदा.ता.तळोदा । वार्ताहर
तळोदा तालुक्यातील रांझणी येथील शेठ राणूलाल फुलचंद जैन कृषि तंत्र विद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे प्रा.शरद साठे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्तावित भिक्कन पाटील यांनी केले. यावेळी प्रा.शरद साठे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी माहिती देतांना सांगितले की, सावित्रीबाई फुले या भारताच्या प्रथम महिला शिक्षीकाच नव्हे तर त्या एक उत्तम कवियित्री, अध्यापिका, समाजसेविका आणि पहिली विद्याग्रहण करणारी महिला देखील आहेत. या व्यतिरीक्त त्यांना महिलांच्या मुक्तिदाता देखील म्हंटले जाते. त्यांनी आपले संपुर्ण आयुष्य महिलांना शिक्षित करण्याकरीता आणि त्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्याकरता खर्ची घातले. महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणतांना सावित्रीबाई फुले यांना अनेक संघर्षांना सामोरे जावे लागले. परंतु त्यांनी हार मानली नाही आणि धैर्य खचू न देता आत्मविश्वासाने संघर्षाला सामोरे गेल्या आणि यश मिळवले असे सांगितले. या कार्यक्रमाला प्रा.शरद साठे, भिक्कन पाटील, जिजाबराव पवार, दिपक मराठे आदींसह विद्यार्थी व विद्यार्थींनी उपस्थित होते.