नंदुरबार l प्रतिनिधी
नर्मदा काठावरील गाव पाड्यांवरील नागरीकांच्या आरोग्यासाठी असलेल्या तरंगता दवाखान्यांबाबत अनेक तक्रारी दाखल झाल्याने कोबो ॲपच्या माध्यमातून आता वॉच ठेवला जाणार आहे.त्यामुळे ऑनलाईन ट्रॅकींग होण्यास देखील मदत होणार आहे.माहिती अपलोड करतांना नेटवर्कची अडचण असल्यास नेटवर्कमध्ये आल्यावर माहिती अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे.यामुळे आता दांडी मारणार्या कर्मचार्यांवरदेखील या माध्यमातून नियंत्रण ठेवणे सोपे होणार आहे.दरम्यान जि.प.च्या स्थाई सभेच्या बैठकीत तरंगत्या दावाखान्या बाबत सदस्यांनी तक्रार केल्यांनतर दुसर्याच दिवशी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गोविंद चौधरी यांनी भेट दिली.
सातपुडयातील धडगाव व अक्कलकुवा दोन्ही तालुक्यातील नर्मदा काठावरील ३३ गावातील लोकांच्या आरोग्यासाठी शासनाकडून सरदार सरोव प्रकल्पाच्या जलाशयात एक तरंगता दवाखाना व तीन बोटी देण्यात आल्या होत्या.यापैकी दोन अक्कलकुवा व दोन धडगाव तालुक्यासाठी सध्या कार्यरत आहेत.तर एक तरंगता दवाखाना जवळपास दोन ते अडीच वर्षांपेक्षा अधिकच्या कालावधीपासून नादुरूस्त झाल्याने पडून आहे.कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या आरोग्य सेवेच्या बोटीला आरोग्य विभागाकडून जणू जलसमाधी दिली जात असल्याचे बोलले जात होते.दरम्यान, गेल्या आठवड्यात झालेल्या स्थायी समितीच्या सभेमध्ये समाज कल्याण सभापती रतन पाडवी,जि.प.सदस्य सी.के.पाडवी.विजय पराडके यांनी नर्मदा काठावर आरोग्य सेवा देण्यासाठी असणार्या बोटी व तरंगत्या दवाखान्यात कार्यरत असणारे कर्मचारी नियमित उपस्थित राहत नसल्याची तक्रार केली होती. याठिकाणी भेटी दिल्यावर शिपाया शिवाय कोणीही उपस्थित राहत नसल्याचे सांगण्यात आले होते.त्याचप्रमाणे नादुरूस्त असणार्या तरंगत्या दवाखान्यामुळेदेखील येथील रहिवासी आरोग्य सेवेपासून वंचित राहत आहेत.यामुळे सदरची बाब गांभीर्याने घेवून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.ग़ोविंद पाडवी यांनी पथकासह भेटी देत आरोग्य सेवा सुरळीत करण्याच्यादृष्टीने कार्यरत कर्मचार्यांना सूचना दिल्या आहेत. नर्मदा काठावरील रहिवाशांना तरंगता दवाखाना व बोटींच्या माध्यमातून आरोग्य सेवा पुरविणार्या कर्मचार्यांनी ठरवून दिलेल्या गावाला वेळेवर आरोग्य सेवा द्यावी, औषधी उपलब्ध करुन द्याव्यात,आरोग्य व्यवस्था गतिमान करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या.मणिबेली येथील तरंगत्या दवाखान्यास भेट दिली असता त्यांच्यासोबत पथकात जिल्हा साथ रोग अधिकारी डॉ.नारायण बावा, युनिसेफचे डॉ.नागेश गाडेकर, रोषमाळ येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवाजी पवार, डॉ.संदीप पावरा,डॉ.चेतन रावताळे,आरोग्य सहाय्यक महेश कोळपकर, आरोग्यसेविका अंजना परमार आदी उपस्थित होते.








