नंदुरबार ! प्रतिनिधी
बिलगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात पाण्याची कायमस्वरूपी सुविधा करण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल, त्यासाठी आवश्यक प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी दिले.
धडगाव तालुक्यातील बिलगाव येथे उभारण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीच्या लोकार्पण समारंभप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला जि.प.अध्यक्षा सीमा वळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जि.प.समाज कल्याण सभापती रतन पाडवी, महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, माजी मंत्री पद्माकर वळवी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके, दिलीप नाईक, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.दिनेश वळवी, जि. प. सदस्य संगीता पावरा, जान्या पाडवी, रुपसिंग तडवी, रवींद्र पाडवी आदी उपस्थित होते.
ॲड.पाडवी म्हणाले, सर्व लोकप्रतिनिधी आणि स्थानिकांच्या सहकार्याने चांगली इमारत उभी राहिली आहे. आरोग्य केंद्र परिसरातील भागात पाण्याचे पुनर्भरण करण्याची गरज आहे. पाण्याचा शाश्वत स्त्रोत उपलब्ध झाल्यास पाण्याची कायमस्वरूपी सुविधा करणे शक्य होईल. इमारतीच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्यात यावे. दुर्गम भागात आरोग्यसुविधेसाठी चांगली इमारत उभी राहिल्याने जनतेला चांगली सेवा मिळेल, असे त्यांनी सांगितले.
आरोग्य केंद्रासाठी जमीन देणाऱ्या सुकलाल पावरा यांना पालकमंत्र्यांनी धन्यवाद दिले. बिलगाव परिसरातील विजेची समस्या सोडविण्यासाठी सहकार्य करण्यात येईल असेही पालकमंत्री म्हणाले.
यावेळी श्रीमती वळवी यांनी मनोगत व्यक्त केले. कोरोना संकटकाळात आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती, आरोग्य कर्मचाऱ्यांना त्यांनी धन्यवाद दिले.
बिलगाव प्राथमिक आरोग्यकेंद्र डोंगराळ भागात असून त्याअंतर्गत 11 गावातील 53 पाड्यांचा समावेश होतो. नर्मदा काठावरील भूषा आणि सावऱ्या दिगर या गावांना बोट ॲम्ब्युलन्सद्वारे सेवा देण्यात येते. आरोग्य केंद्र इमारतीच्या बांधकामासाठी 5 कोटी 21 लाख रुपये खर्च झाला आहे. यात वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी निवासस्थानाचा समावेश आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
*राजबर्डी प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत लोकार्पण*
पालकमंत्री पाडवी यांच्या हस्ते राजबर्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचेदेखील लोकार्पण करण्यात आले. यावेळी त्यांनी नागरिकांना कोरोना लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले. तिसरी लाट येऊ नये म्हणून नागरिकांनी दक्षता घेणे गरजेचे आहे असे ते म्हणाले. आरोग्य केंद्राच्या इमारती उभारणे, वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरणे आणि रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्याच्या माध्यमातून दुर्गम भागासाठी सक्षम आरोग्य सुविधा देण्याचा प्रयत्न असल्याचे पालकमंत्री पाडवी यांनी सांगितले.