नंदुरबार l प्रतिनिधी
देशाचे इंधन आयातीवरील हजारो कोटी रुपये वाचविण्यासाठी ३०० बांबू रिफायनरी सुरू कराव्यात,शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर बांबू लागवड करावी.भविष्यातील इथेनॉलची वाढती गरज बांबू लागवडीतून पूर्ण होणार असल्याने आज बांबू लागवड काळाची गरज असल्याचे कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी सांगितले.दरम्यान,वीज निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या दगडी कोळशातून कार्बन डाय ऑक्साईडच्या वाढत्या धोक्यामुळे मानवी जिवित धोक्यात असल्याचा इशाराही पटेल यांनी दिला आहे.
नंदुरबार येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेप्रसंगी ते बोलत होते.यावेळी खा.डॉ.हीना गावित उपस्थित होत्या. यापुढे श्री.पटेल म्हणाले,पेट्रोल आयातीवर देशाला ८ हजार ५० कोटीहून अधिक रक्कम खर्च करावी लागते.इथेनॉल मिश्रीत पेट्रोल वापरण्याचे प्रमाण वाढल्यास या खर्चात बचत होवू शकते.आणखी काही वर्षात देशाला एक हजार कोटी लिटरहून अधिक इथेनॉल लागणार आहे.इथेनॉलची हि गरज भागविण्यासाठी १७ लाख ६० हजार एकरवर बांबू लागवड करावी लागणार आहे.बांबू रिफायनरीतून इथेनॉलची वाढती गरज भागू शकणार आहे.यातून शेतकऱ्यांना मोठे उत्पन्न मिळू शकेल.यासाठी ३०० बांबू रिफायनरी सुरू कराव्यात अशी मागणी केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांना भेटून केली असल्याचे पटेल यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, सध्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.सध्या पेट्रोल-डिझेलच्या वाहनांमुळे प्रदूषणात देखील घट मोठी वाढ झाली आहे.इथेनॉल मिश्रित पेट्रोल वापरल्यास प्रदूषणदेखील कमी होवू शकते.इथेनॉलची सध्याची गरज लक्षात घेता भविष्यात लाखो लिटर इथेनॉल लागणार असल्याने त्याचे नियोजन आतापासूनच करणे गरजेचे आहे.यामुळे बांबू रिफायनरी सुरू करण्यास प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, बांबू लागवड केल्यास शेतकऱ्यांना होणाऱ्या फायद्याबाबत श्री.पटेल यांनी सांगितले की, बांबू हे पीक कमी खर्चात येते.या पिकासाठी फार खर्च लागत नाही.बांबू रिफायनरी सुरू झाल्यास बांबू उत्पादनाला प्रोत्साहन मिळेल.शेतकरी बांबूच्या उत्पादनाकडे वळल्यास त्यांना पारंपारिक पिकाच्या तुलनेत समाधानकारक फायदा होवू शकतो.एकरी शेतकऱ्याला किमान दोन लाख रुपये यातून मिळणार असल्याचा दावा पटेल यांनी केला.








