नंदुरबार l प्रतिनिधी
जिभाऊ करंडक या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेमुळे नंदुरबार जिल्ह्यातील नाट्य चळवळीला गती प्राप्त होईल, यात शंका नाही. या स्पर्धेमुळे नंदुरबार जिल्ह्यातील कलावंतांसाठी चांगली संधी निर्माण झाली आहे. जिभाऊ करंडक स्पर्धेत दोन दिवसात स्पर्धकांनी चांगली साथ देऊन वेगवेगळ्या विषयांवर प्रभावीपणे एकांकिका सादर केल्या. यात राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेमुळे नंदुरबार जिल्ह्याचे नाव राज्यभरात होत आहे, असे प्रतिपादन नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲड.सीमा वळवी यांनी केले. जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या बक्षिस वितरण प्रसंगी ॲड.वळवी बोलत होत्या.
कालकथित जयदेव निंबा पेंढारकर अर्थात जिभाऊ यांच्या स्मरणार्थ गाडगे बाबा शैक्षणिक व सांस्कृतिक सेवा मंडळ, शिंदे तर्फे नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी नाट्य मंदिरात जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभप्रसंगी जि.प.अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरे, सिने दिग्दर्शक श्याम रंजनकर, प्रा.डॉ.शिवानंद सुर्यवंशी, चंद्रशेखर चव्हाण, पुरुषोत्तम विसपुते, रोटरी नंदुरबारचे अध्यक्ष ऑर्किटेक निरज देशपांडे, कृषि अधिकारी विजय मोहिते, गिरीष वसावे, रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे अध्यक्ष मनोज गायकवाड आदी उपस्थित होते. या स्पर्धेदरम्यान माजीमंत्री ॲड.पद्माकर वळवी, शिरपूर येथील किसान विद्या प्रसारक संस्थेचे सचिव निशांत रंधे, नंदुरबार जिल्ह्याचे डीवायएसपी सचिन हिरे, डॉ.भगवान पटेल यांनीही उपस्थिती लावली. यावेळी डॉ.विक्रांत मोरे म्हणाले की, कोणत्याही स्पर्धेची सुरुवात करता येेते, मात्र त्यात सातत्य ठेवणे ही अवघड बाब आहे. हे सातत्य जिभाऊ करंडक आयोजन समितीने ठेवत तब्बत अकरा वर्ष या स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले. त्याबद्दल आयोजन समितीचे कौतुक करतो. जिभाऊ करंडकमुळे नंदुरबारचे नाव भविष्यात राज्यस्तरावर उंचावेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. या दोन दिवशीय स्पर्धेचे परिक्षक म्हणून महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम कुणाल मेश्राम, नाट्यअभिनेता दिग्दर्शक तथा सहाय्यक प्राध्यापक थिएटर्स आर्टस विभाग मुंबई विद्यापीठाचे डॉ.प्रदीप सरवदे, अभिनेत्री, दिग्दर्शिका तथा वेशभुषाकार स्नेहाकुमार यांनी काम पाहिले. बक्षिस वितरण प्रसंगी कुणाल मेश्राम व प्रा.डॉ.प्रदीप सरवदे यांनी स्पर्धकांशी व प्रेक्षकांशी संवाद साधला. दोन दिवसात नाट्य रसिकांच्या गर्दीने नाट्यगृह चंागलेच भरले होते. नंदुरबार, शहादा, दोंडाईचा, धुळे, साक्री येथील नाट्यकर्मींनी जिभाऊ करंडक स्पर्धेत या दोन दिवसात हजेरी लावली.
राज्यभरातून २५० नाट्यकलावंतांची हजेरी
जिभाऊ करंडक आयोजन समितीतर्फे दिला जाणारा दिपस्तंभ हा पुरस्कार साहित्यीक तथा पत्रकार रमाकांत पाटील यांना देण्यात येणार होता. मात्र ते अनुपस्थित असल्यामुळे त्या दिपस्तंभ पुरस्काराचे वाचन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज कोणाचे? या किल्लेधारुर (बीड) येथील एकांकिकेस प्रेक्षकांनी दाद देत शिवाजी महाराजांच्या जय जयकाराच्या घोषणा देवून नाट्यगृहातील वातावरण भारुवून टाकले. या दोन दिवसात राज्यभरातील १५ एकांकिकेच्या माध्यमातून जवळपास २५० नाट्यकलांवतांनी सहभाग नोंदविला. बक्षिस वितरण प्रसंगी नाट्यगृहात उत्साहाचे वातावरण होते. तर विजेते स्पर्धक जल्लोष करीत होते. सिने दिग्दर्शक श्याम रंजनकर यांच्या आंतरदृष्टी या शॉर्टफिल्मला रिल्स इंटरनेशनल फिल्म फेस्टीव्हलतर्फे बेस्ट शॉर्टफिल्म अवॉर्ड मिळाल्याबद्दल त्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळी प्रसिद्ध हास्य कलाकार विलासकुमार शिरसाठ यांचा तुफान स्टॅण्डअप कॉमेडीचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रेक्षकांनी भरभरुन दाद दिली. एकांकिका स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी ७ एकांकिकांचे सादरीकरण झाले. या सर्व एकांकिकांना प्रेक्षकांनी भरभरुन दाद दिली.
बक्षिस वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयोजक नागसेन पेंढारकर व तुषार ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक मनोज सोनार, राजेश जाधव, आशिष खैरनार यांच्यासह सागर कदम, चिदानंद तांबोळी, नरेंद्र तुंबा पाटील, तुषार सांगोरे, कुणाल वसईकर, जितेंद्र पेंढारकर, एस.एन.पाटील, जितेंद्र खवळे, नरेंद्र पाटील, दर्शन सोनार, पार्थ जाधव, प्रफुल्ल महिरे, सुनिल चौधरी, रवींद्र कुलकर्णी, विनोद ब्राम्हणे, दीपश्री खैरनार, राहुल खेडकर, गौरव पाटील, तनिष्का पेंढारकर, मनोज वाघ, तुषार सोनवणे आदींनी परिश्रम घेतले.
स्पर्धेचा निकाल
या दोन दिवशीय जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे.
सांघिक स्पर्धेत प्रथम-म्याडम (म.गांधी महाविद्यालय, चोपडा), द्वितीय-जिर्णोद्धार (अभिनय, कल्याण), तृतीय कस्तुरी (वूमन्स डेव्हलपमेंट ऍण्ड रिसर्च सेंटर, किल्लेधारुर, बीड), उत्तेजनार्थ-खारुदादाचा ड्रॅमेटीक विकेंड (नवरस कलारंग सांस्कृतिक अकादमी, बोईसर), लक्षवेधी-छत्रपती शिवाजी महाराज कोणाचे? (सनी कलामंच, किल्लेधारुर, बीड), वैयक्तिक उत्कृष्ठ अभिनय पुरुष ः शिवराम सुभाष गावंडे (जिर्णोद्धार) (प्रथम), रवींद्र कटारे (नेकेड ऍन्ड अफ्रेड) (द्वितीय), निखिल भास्कर जाधव (संजीवनी), उत्कृष्ट अभिनय स्त्री ः गौरी दीपक चौधरी (म्यॉडम), मनाली राजश्री (जिर्णोध्दार), रुपाली पाटील (मुुंग्या), उत्कृष्ट दिग्दर्शन ः मनोज मकरंद (म्याडम), अभिजीत झुंझारराव (जिर्णोद्धार), आसेफ शेख (कस्तुरी), सर्वोत्कृष्ट लेखन ः आसेफ शेख (छत्रपती शिवाजी महाराज कोणाचे?) सर्वोत्कृष्ट संगीत ः सेजल साठे (कस्तुरी), सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना ः शिवाजी विठ्ठल शिंदे (खारुदादाचा ड्रॅमेटिक विकेंड), सर्वोत्कृष्ट नैपथ्य ः दिपेश किर्तीवंत शुक्ल (म्याडम).








