विसरवाडी l प्रतिनिधी
नवापुर तालुक्यातील विसरवाडी येथे महाशिवरात्री निमित्त विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांत धर्म प्रसारक विभाग व देवमोगरा माता पदयात्रा मंडळ विसरवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने विसरवाडी ते देवमोगरा पालखी पदयात्रेचे आयोजन केले आहे.यावेळी परिसरातील शेकडो तरुणासह महिलांनीही सहभाग नोंदविला आहे.

विसरवाडीतील श्री.शनेश्वर मंदिर येथे भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य, तथा आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत, भाजपा नवापूर तालुका अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य भरत गावित यांच्या हस्ते पालखीचे पुजन करुन गावातून प्रमुख मार्गे देवमोगरा देवीच्या गाण्यांनी बॅन्ड पथकाच्या तालावर २५० भाविकांचा जथ्था विसरवाडी हुन देवमोगरा (गुजरात) कडे रवाना झाला.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून बंद असलेली मंदिरे कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने धार्मिकस्थळे भाविकांना दर्शनासाठी खुली करण्यात आल्याने यावर्षी याहा मोगी माता पदयात्रा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात विसरवाडी, श्रावणी, खांडबारा, खैरवे, आर्डीतारा, धानोरा, शेगवा, वेलदा पाणीटाकी, बेज, वाण्याविहीर, अक्कलकुवा, खापर, सेलंबा, सागबारा, आणि देवमोगरा असे १२० किलोमीटर अंतर कापत पदयात्री गुजरात राज्यातील देवमोगरा येथे याहामोगी मातेचे दर्शन घेऊन पदयात्रेचे समारोप होणार आहे.
ह्यावर्षी पालखी पदयात्रेतील भाविकांसाठी अल्पोपाहाराची व्यवस्था विसरवाडी सरपंच बकाराम गावित व दिपेश गावित मित्र मंडळ तसेच अजय अग्रवाल व मगन अग्रवाल यांच्या तर्फे सरबत वाटपाचा कार्यक्रम ग्रामपंचायत चौकात घेण्यात आला.








