नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार जिल्ह्यातून हद्दपारीचे आदेश असतानाही शहरात फिरणाऱ्यास एकास पोलिसांनी शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले.
याबाबत अधिक माहिती अशी की, दीपक नारायण मराठे रा. मरीमाता मंदिराजवळ, नंदूरबार असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. दीपक मराठे याचे उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशाने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सप्टेंबर २०२१ मध्ये नंदुरबार जिल्ह्यातून आठ महिन्यांकरिता हद्दपार करण्यात आले होते. दरम्यान, त्याला पोलिसांनी गुजरात राज्यात सोडले होते. परंतु, शनिवारी दीपक मराठे हा शहरातील बाहेरपुरा भागातील मरिमाता मंदिर परिसरात फिरत असल्याचे एलसीबीच्या पथकाला दिसून आले होते. यातून पथकाने त्यास ताब्यात घेतले होते. दरम्यान, त्याच्याविरोधात पोलीस शिपाई अभय राजपूत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात हद्दपारीच्या आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक बलविंदर ईशी करीत आहेत.








