नंदुरबार l प्रतिनिधी
मध्यप्रदेश राज्यातुन नंदुरबार जिल्ह्यातील शहादा मार्गे गुजरात राज्यात गांजा विक्री साठी जाणाऱ्या तीन जणांना बोलेरो गाडी सह शहादा पोलिसांनी अटक केली आहे. सदर व्यक्तींकडून 45 हजार 731 रुपये किमतीचा सहा किलो 500 ग्रॅम गांजा जप्त करून शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

विशेष म्हणजे सदर गांजा विक्री साठी जाणाऱ्या व्यक्तींकडून सात लाख किमतीची बोलेरो गाडीही जप्त केली आहे. मध्यप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र तीन राज्यांच्या सीमेतुन प्रवास करून गांजा तस्करी करणाऱ्या आरोपींकडून पोलिसांना चकमा देण्यासाठी या बोलेरो गाडीत दोन नंबर प्लेट वापरत असल्याचे तपासात उघड झाले आहे. आरोपी राजेश सपन विश्वास, वर्जन नारायण पावरा, राजेश भटुसिंग पावरा राहणार नांदियाबड तालुका पानसेमल जिल्हा बडवानी मध्यप्रदेश राज्यातून असून 45 हजार 731 रुपये किमतीच्या गांजा व सात लाख रुपये किंमतीची बोलेरो गाडी असे एकूण सात लाख 45 हजार 731 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर गुन्ह्याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत हे करीत आहे.








