तळोदा l प्रतिनिधी
नवापुर तालुक्यातील खांडबारा- नंदुरबार रस्त्यावरील वाटवी गावाजवळ बेकरीचे साहित्य घेऊन जाणारा टेम्पो व कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहा जण जखमी झाले आहेत. तर एका महिलेची प्रकृती गंभीर आहे.

प्रत्यक्ष सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ऑडी कार (क्र.जी.जे.21,ए.क्यु. 9839) मधील शाह कुटुंब शिरपूर येथील निम्स कॉलेज मधून त्यांची मुलगी विधी शाहला घेण्यासाठी गेले होते. शिरपूरहून-अंकलेश्वरला येत असताना आज संध्याकाळी साडे चार वाजेच्या सुमारास खांडबारा नजीक वाटवी गावाजवळ कार व बेकरीचा टेम्पोची जोरदार धडक झाली.या अपघातात अंकलेश्वर येथील मुक्ती शहा यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर किरकोळ जखमींवर खांडबारा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहने चक्काचूर झाले आहे. बेकरी साहित्य घेऊन जाणारा टेम्पो (क्र. जी.जे.19,एक्स. 5364) चा चालक सुनिल व सहचालक दुर्गेश देखील जखमी झाला आहे. अपघातात बेकरीचे साहित्याचे नुकसान झाले.रस्त्यावर बिस्कीट, पाव, ब्रेडचे साहित्य व पाकीट पडलेले आहेत.घटनास्थळी नंदुरबार पोलीस उपविभागीय अधिकारी आत्माराम प्रधान व आजूबाजूच्या नागरिकांनी अपघातग्रस्तांना मदत केली तात्काळ 108 रुग्णवाहिकेचा माध्यमातुन रुग्णालयात पाठवण्यात आले.या अपघातात स्नेहल शाह,प्रणव भट, विधी शाह यांना किरकोळ दुखापत झाली आहे तर मुक्ती शाह यांना गंभीर दुखापत झाली आहे. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे.
अपघात दरम्यान मार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती खांडबारा पोलिसांनी तात्काळ मदतकार्य करित वाहतूक सुरळीत केली.








