नवापूर l प्रतिनिधी
नवापूर येथील आशिका सोनार ही विद्यार्थिनी रशिया – युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्ध परिस्थितीत अडकल्याने भारतात परतण्याच्या बेतात असलेली आशिका ध्रुवराज सोनार . प्रभाकर कॉलनी, नवापूर, जि. नंदुरबार) या वैद्यकीय अभ्यासक्रमातील विद्यार्थिनीचा प्रवास पूर्णतः रोखला गेला आहे. पुण्यातील दोन तर मुंबईतील एकीसह चौघे होस्टेलवरच अडकून पडल्याची माहिती आशिकाने आपल्या नातेवाईकांना दिली. युक्रेनमधील मिकोलाईव्ह, ओब्लास्ट या भागात ती अडकली आहे. तिचा दि. २४ रोजीचा नियोजित प्रवास रद्द झाला आहे. आशिकाने दि. २६ फेब्रुवारी रोजीचे तिकीट काढले आहे. मात्र परतीच्या प्रवासाच्या वाटा सध्यातरी बंदच आहेत. दि. ५ जानेवारी रोजी मिकोलाईव्ह येथील पेट्रो मोहल्या ब्लॅक सी’ या विद्यापीठात ती एमबीबीएसच्या पहिल्या वर्षात प्रवेशित झाली. आशिका ही नवापूरच्या शिवाजी हायस्कूलमधून बारावी उत्तीर्ण झाली आहे.
दरम्यान रशिया व युक्रेन या देशात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून युक्रेनमध्ये नंदुरबार जिल्ह्यातील जे नागरीक व विद्यार्थी अडकले असतील त्यांच्या नातेवाईकांनी जवळच्या तहसिल कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले होते.त्यानुसार अद्यापपावेतो युक्रेनमध्ये असणाऱ्या नऊ विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क केला आहे.








