नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार प्राथमिक शिक्षण विभाग , जिल्हा परिषद , नंदुरबार अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांना जिल्हा निर्मितीनंतर पहिल्यांदाच निवड श्रेणी मंजूर करण्यात आली आहे .
प्राथमिक शिक्षण विभागात कार्यरत 2106 प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी मंजूर असल्याने निवडश्रेणीसाठी मंजूर करावयाची संख्या 20 टक्के च्या प्रमाणात एकूण 421 निर्धारित करण्यात आली होती . यात 24 वर्ष अर्हताकारी सेवा पूर्ण असलेल्या शिक्षकांची संख्या 1138 असून निवडश्रेणीसाठी 873 शिक्षकांनी प्रस्ताव सादर केले होते . त्यापैकी पदवी / पदव्युत्तर शैक्षणिक अर्हता प्राप्त केलेल्या शिक्षकांची संख्या 738 होती . या 738 शिक्षकांपैकी निवडश्रेणीचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शिक्षकांची संख्या 130 असल्याने निवडश्रेणी समितीच्या विचारार्थ ठेवण्यात आलेल्या प्रस्तावांची निवडश्रेणी समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे , समितीचे सदस्यसचिव तथा माध्यमिक शिक्षणाधिकारी एम . व्ही . कदम आणि समिती सदस्य तथा प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ . युनूस पठाण यांनी छाननी व तपासणी केल्यानंतर या 130 शिक्षकांना समितीमार्फत निवडश्रेणी मंजूर करण्यात आली आहे . निवडश्रेणी मंजूर व्हावी म्हणून प्राथमिक शिक्षक संघटनांनी वेळोवेळी मागणी व पाठपुरावा केलेला त्याअनुषंगाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी शिक्षण विभागाला निर्देश देऊन निवड श्रेणी मंजूरीची प्रक्रिया सुरु केली होती . प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ . युनूस पठाण यांची याकामी समन्वयक म्हणून देखील नेमणूक करण्यात आली होती . निवडश्रेणी मंजूर करण्याच्या प्रक्रियेत विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी सुभाष मारनर , कनिष्ठ सहाय्यक सुनिल गिरी , तंत्रस्नेही शिक्षक नितीन शिनकर तसेच सर्व तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी आणि आस्थापना लिपीक यांनी परिश्रम घेतले आहेत . जिल्हा निर्मितीनंतर पहिल्यांदाच शिक्षक संघटनांच्या मागणी व पाठपुराव्यानुसार शिक्षण विभागाने मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे , उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ . वर्षा फडोळ , माध्यमिक शिक्षणाधिकारी एम.व्ही . कदम यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शिक्षकांना निवडश्रेणी मंजूर केली आहे .








